दगा फटका कोणी केला? भाजपने गद्दारांना सोबत घेऊन सरकार बनवलं आहे. आणि आपण दगा फटक्याच्या गोष्टी करता अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही भाजपची रोजी रोटी असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, गेल्या काही दिवसांत आमचे काही घटक पक्ष हे या भुमिकेत आहे की संवाद तुटला आहे. हा संवाद जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही. शिवसेना भाजप युतीमध्ये संवाद संपल्याने युती तुटली होती. 2019 साली योग्य प्रकारे संवाद झाला नाही त्याचा परिणाम युती तुटण्यात झाला. इंडिया आघाडीत 30 पक्ष आहे, या 30 पक्षांसोबत संवाद ठेवण्यासाठी जबाबदार नेत्यांची नियुक्ती झाली पाहिजे. इंडिया आघाडीच्या बैठकीत माननीन उद्धव ठाकरे यांनी सतत सांगितले आहे. इतर प्रमुख नेत्यांनीही हा विषय मांडला आहे. पण एक मात्र सत्य आहे, जे ओमर अब्दुल्लाह आणि इतर नेत्यांनी सांगितले की ही आघाडी लोकसभा निवडणुकासाठी निर्माण झाली होती. हे जरी खरं असलं तरी देशाच्या राजकारणात इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी केली. नरेंद्र मोदींचं बहुमत संपवून टाकलं. म्हणून ही आघाडी टिकायला हवी. फक्त संसदच नव्हे तर संसदेच्या बाहेरही आम्ही काम करायला पाहिजे. ज्या पद्धतीने हुकुमशाही डोकं वर काढत आहे. ती बाब चिंताजनक आहे. आघाडीतला मोठा पक्ष म्हणून काँग्रेस नेतृत्वाची आहे, ही जबाबदारी काँग्रेस पक्षानेच घेतली पाहिजे. आपापसांत निवडणूक लढणे चुकीचे नाही. दिल्लीत आप आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. तसं आम्ही म्हणालो की महानगर पालिकेत आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. पण हा वेगळा विचार करताना आपल्या एकेकाळच्या सहकाऱ्यावर किंवा भविष्यात लोकसभेला आपण पुन्हा एकत्र येणार असे चित्र असेल तर अगदी देशद्रोही ठरवण्या इतपत कुणीही आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊ नये ही शिवसेनेची आणि उद्धव ठाकरे यांची भुमिका आहे असे संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही भाजपची रोजी रोटी
उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही भाजपची रोजी रोटी आहे. दगा फटका कोणी केला? भाजपने गद्दारांना सोबत घेऊन सरकार बनवलं आहे. आणि आपण दगा फटक्याच्या गोष्टी करता. या देशामध्ये गद्दारीला, बेईमानीला आणि घटनाबाह्य गोष्टींना कोणी खतपाणी घातलं असेल, तर ते नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी घातलं आहे. आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करतात. शरद पवार यांच्यावर टीका करतात. उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तुम्ही पोट भरत आहात अजून. हे महाराष्ट्रात बोलले आणि शिर्डीत उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवल्या हा महाराष्ट्राचा अपमान आहे. शरद पवार साहेबांनी राजकारण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात आपली हयात घालवली. आणि त्याबद्दल मोदी सरकारने त्यांना पद्मविभुषण हा किताब दिलेला आहे. त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दांत वक्तव्य करणं हे भाजपच्या नेत्यांना आवडंलय का? हा त्यांनी खुलासा करावा. कुणी केंद्रीय मंत्री असतील, कुणी गृहमंत्री असतील. पण या महाराष्ट्राला स्वाभिमान आहे. ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला आहे त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते शरद पवार यांच्यापर्यंत अनेक नेत्यांचं योगदान आहे. तुम्ही आमच्या राज्यात टीका करता. टीका करायला तुम्हाला कोणी अडवलं नाही. पण जी भाषा वापरता आणि समोर बसलेली गुलामांची औलाद टाळ्या वाजवते. ज्यांनी या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला ताठ मानेने उभ केलेलं आहे, लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला.
फडणवीसांनी बीडमध्ये जावं
या राज्याचे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाहीत तोपर्यंत हे चालूच राहिल. आज काही पोरा टोरांना मोक्का लावला आहे. हे प्यादी आहे, ही भाडोत्री पोरं आहेत. मुख्य आरोपी मोकाट आहेत, त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकला असून तो सुटेल आता. त्यांचे बॉस मंत्रीमंडळात आहेत.केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात आले, त्यांना राज्याची परिस्थिती माहित नाही? गुंडांच्या मदतीने असे राज्य चालवणे ही महाराष्ट्राशी गद्दारी आणि बेईमानी आहे.
हुकूमशाही आणि संविधानावर हल्ले
देशापुढे सर्वात मोठे संकट हे मोदी आणि शहा आहेत. त्यांची हुकूमशाही आणि संविधानावर होणारे हल्ले हे मोठे संकट आहे. जर त्यांच्या विरोधात आम्हाला लढायचे आहे तर इंडिया आघाडीला आणखी मजबुतीने काम करण्याची गरज आहे अशी आमची भुमिका आहे.
विश्वगुरुंना आमंत्रण नाही
महाराष्ट्रात भाजप कशी जिंकली हे सगळ्या जगाला माहित आहे. यामुळेच देशात जे काही सुरू आहे त्यामुळे ट्रम्प यांनी मोदींना शपथविधीसाठी बोलावलं नाहिये. देशात लोकशाहीची हत्या सुरू आहे, सगळं संपतंय. त्यामुळेच अमेरिकेने आपल्या विश्वगुरूंना शपथविधीसाठी नाही बोलावलं.