मस्साजोग हत्या प्रकरण: एक मोठं डिलं आहे! मुंडे-धसांच्या भेटीवर संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवलं. या प्रकरणात आधी आक्रमक भूमिका घेणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी बावनकुळे आणि धनंजय मुंडे यांचीशी भेट घेतली आणि नंतर त्यांचा सूर नरमला. त्यामुळे देशमुख कुटुंबाची फसवणूक झाली. बावनकुळे यांच्या घरी नक्की काय झालं? धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट का घेतली? असे सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात मोठं डील झालं असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

सुऱेश धस ज्या वेगाने पुढे गेले. ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले,ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद, पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला. आपण कोणाला भेटायला जातोय आणि आपण कोणासाठी भेटतोय. आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो. याचं भानं त्यांनी ठेवायला पाहिजे होतं. ते त्यांनी ठेवलं नाही. पण मी आधीच सांगितलं होतं, एका प्रमुख माणसाने मला सांगितलं होतं की सुरेश धस माघार घेतील. त्यांची ती परंपरा आहे. एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्या नंतर ते शांत बसतील. तसंच झालेलं आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी यावेळी केला.

‘हे फार मोठं डील झालेलं आहे. हे डील राजकीय आणि आर्थिक दोन्ही आहे. या लढ्यात जे उतरलेले आहेत, मग सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया असतील त्यांच्याशी मी या विषयावर बोलेन’, असंही संजय राऊत म्हणाले.

‘या सगळ्या प्रकरणात धस यांना ट्र्रॅप करण्याचा प्रयत्न झाला आहे असे ते म्हणतात. त्यांना ट्रॅप कोणी केलं. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत. मग त्यांच्या बॉसनेच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं हे पूर्णपणे चुकीचं आहे. कोण कशाला ट्रॅपमध्ये पकडतील. तिकडे आकाचे आका आले, त्याच क्षणी त्यांनी त्य़ा बैठकीतून बाहेर पडायला पाहिजे होतं. याला नैतिकता म्हणतात आणि बाहेर येऊन सांगायला हवं होतं, की माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झालेला आहे. मला ट्रॅपमध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला. म्हणून मी इथून बाहेर पडलो. आता कशाला आक्रोश करताय?’, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संवाद राजकारणात असला पाहिजे पण गुन्हेगारांशी असावा का. ज्यांच्यावर आरोप आहे, ज्यांचा खुनाच्या प्रकरणात राजीनामा मागितला जातो. त्यांच्याशी संवाद ठेवावा का असं जर कोणाचं म्हणणं असेल तर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गुन्हेगाराशी राजकारण्यांना संवाद ठेवावा लागेल, असा मुद्दा संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ‘तुम्हाला गुन्हेगारी मोडून काढायची आहे ना, तुम्हाला खुनी आणि बलात्काऱ्यांना तुरूंगात टाकायचं आहे, त्यांच्याशी तुम्ही संवाद ठेवा सांगताय. गृहमंत्र्यांना समजायला पाहिजे की ते नक्की कोणत्या प्रकारची विधानं करतायेत. त्यांच्या विषयी लोकांच्या मनात जो आदर आहे तो अशानं कमी होईल, असंही राऊत म्हणाले.

ही तर टोलवा टोलवी…

फडणवीस आणि अजित पवार हे टोलवा टोलवी करत आहेत. या कोर्टातून त्या कोर्टात बॉल टाकतायेत, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला.आम्ही लवकरचं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व नेते बीडला जाणार आहोत. आम्ही गेल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही तेथे येतील.आम्ही देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहोत. आम्ही वाट पाहत होतो. आम्हाला वाटलं ज्याप्रमाणे सुरेश धस किंवा इतर सगळे प्रमुख लोकं या विषयाला वाचा फोडतात, संघर्ष करतात पण हा सगळा एक घोटाळा झाल्यामुळे आम्हाला असं वाटतय ही वेळ आहे की शिवसेनेला आता या विषयात लक्ष घालावं लागेलं, असंही ते म्हणाले.

देशमुख कुटुंबाची फसवणूक

आता देशमुख कुटुंब खऱ्या अर्थाने निराधार आणि पोरंक झालेलं आहे. त्यांची फसवणूक झालेली आहे. ही आमची भावना असल्याचं राऊत म्हणाले.