एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 15 लाख कोटींचे उद्योग आणले त्याचे काय झाले? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच संविधान राबवायला डोकं लागतं, 2014 नंतर असं कोणतंही डोकं दिसलं नाही असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मिळालेल्या मतांमध्ये प्रचंड तफावत आहे. हे मतदान वाढलं कसं? याची नोंद कुठे आहे. तर ते झटकून टाकता. एकेक मताला किंमत आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले होते. एका मताने आमदार खासदार निवडून येतात आणि पडतात. आणि 76 लाख मंत अचानक वाढतात. मतदार यादीत घोळ होतो आणि त्यावर निवडणूक आयोग बोलत नसेल तर संविधान आहे कुठे. पूर्वी बुथ कॅप्चर व्हायचे. परवा अमित शहा आले आणि त्यांनी नवीन नारा दिला आहे. मेरा बुथ सबसे मजबूत. शेवटच्या तीन चार तासांत प्रत्येक बुथवर, मतदार यादीत आणि ईव्हीएममध्ये घोटाळे करण्यात आले आहेत. तर हे सगंळ संविधानाविरोधात असताना देशाच्या प्रजासत्ताक दिनाचा आम्ही गौरव करतो पण आपला देश प्रजासत्ताक खरोखर राहिलेला नाही. ज्या देशात निष्पक्षः निवडणुका होत नाहीत, ज्या देशात निवडणूक पद्धत पारदर्शी नाही, त्या देशातले प्रजासत्ताक संकटात आहे. म्हणून राष्ट्रपतीनी आपल्या भाषणात संविधानाची केलेली भलामण ही आश्चर्यकारक आहे. आमचा आक्रोश तुमच्यापर्यंत जात नसेल तर या देशात कुठले संविधानिक मूल्य राहिलेले आहे? मला याचे आश्चर्य वाटतं.
तसेच काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रात आम्ही संविधानाचे आणि भारतमातेचं पूजन केलं. आम्ही संविधान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. संविधान राबवायला डोकं लागतं. 2014 नंतर असं कोणतंही डोकं मला दिसलं नाही. या देशाच्या संविधानाचे रक्षण करण्याचे काम 1947 पासून आम्ही, आमच्या पूर्वसुरींनी केलं. न्यायालयात जेव्हा शपथ घेतात, तेव्हा लोक धर्मग्रंथावर शपथ घेत होते. तेव्हा संविधानावर हात ठेवून शपथ घ्या अशी भूमिका हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. सत्ता माणसाला बिनडोक बनवते हे मला अलीकडे दिसतंय. नामर्द आणि वेड्यांच्या हातात सत्ता गेली तर काय होऊ शकतं हे देशातलं आज चित्र आहे. ही सत्ता जशी वापरली जाते त्यात उत्तम डोकं आहे त्याचं लक्षण नाही असेही संजय राऊत म्हणाले.
मी इंदिरा गांधी यांची आणिबाणी पाहिली आहे. आणिबाणी समजून घेण्यासाठी मला कंगणा रनौतचा चित्रपट पाहण्याची गरज नाही. हा चित्रपट संपूर्णपणे आपटला आहे. जे इमरजन्सी चित्रपटात दाखवलं आहे ते खरं नाही. त्यापेक्षा भयंकर आणिबाणी ही देशात सुरू आहे. मी आज संविधानाबद्दल बोललो, राष्ट्रपती मुर्मू या संविधानाबद्दल बोलल्या. भाजपवाले म्हणतात की 1975 साली जेव्हा ही आणिबाणी लागू केली तेव्हा राष्ट्रपती फक्रूद्दीन अली झोपले आणि त्यांना उठवून विधेयकावर स्वाक्षरी घेतली गेली आणि देशात आणिबाणी लागू झाली. आज राष्ट्रपतींना रात्री उठवण्याची गरज नाही. आज दिवसाढवळ्या आणिबाणी लावली जात आहे. राष्ट्रपती भवनात विधेयकावर सही करण्याचीही गरज उरलेली नाही. आज अशीच आणिबाणी लागू आहे. पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची आणिबाणी लागू आहे. कंगणा रनौतचा चित्रपट संपू्र्णपणे आपटला आहे, मी सुद्धा चित्रपटांचा जाणकार आहे. मी नेहमी चित्रपट पाहतोय. हे सरकार स्थापन झाल्यापासून इतिहासाची मोडतोड करून चित्रपट बनवण्याचे काम सुरू झाले आहे. ताश्कंद फाईल्स, कश्मीर फाईल्स, अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर. यात जो इतिहास दाखवला गेला तो खरा नाही. तसाच हा चित्रपट आहे इमरजन्सी. 1975 साली आणिबाणी लागू केली तेव्हा देशात काय सुरू होतं ते एकदा जाणून घ्या. एका केंद्रीय मंत्र्यांची हत्या झाली, पंतप्रधान
इंदिरा गांधी यांना मारण्याचा कट रचणारे आणि त्यासाठी बॉम्बची फॅक्टरी बनवण्यात आली होती. जॉर्ज फर्नांडिस मोठे नेते होते आणि आम्ही त्यांचे भक्त होतो. पण जेव्हा पंतप्रधानांना मारण्यासाठी कुणी बॉम्बची फॅक्टरी बनवतं असेल तर काय त्यांची पुजा करायची? मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान त्यांना कुणी पत्र लिहून, फोन करून धमकी दिली तर त्याला वर्षानुवर्ष तुरुंगात डांबलं जातं. हेच त्यावेळी होत होतं. आणिबाणीत काही चुकीच्या गोष्टी झाल्या, त्याबद्दल इंदिरा गांधींनी मोठ्या मनाने माफीही मागितली. आम्ही आणिबाणी पाहिलीये, तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आणिबाणीला समर्थन दिले होते. कारण देशात आणिबाणी लागली तरच देशात अनुशासन येईल अशी सर्वांची भूमिका होती.
सत्ताधाऱ्यांमध्ये मरगळ आहे, कारण विजयाच्या धक्क्यातून ते सावरलेले नाहियेत. अजून ते आडवे पडलेले आहेत. आपण कसे जिंकलो यासाठी ते एकमेकांना चिमटे काढत आहेत. लाखालाखाच्या फरकांनी जे जिंकले त्यांना धक्का बसलाय. आमच्या कार्यकर्त्यांत थोडीफार अस्वस्थता असेल तरी हळूहळू आम्ही दूर करू.
कोणत्याही परिस्थिती महाविकास आघाडी आम्हाला टिकवायची आहे. पण काही शहरांतले प्रश्न, समस्या वेगळ्या असतात. स्वतंत्र लढण्याची क्षमता आमच्यात आहे असं आम्हाला वाटत असेल तर आम्ही स्वतंत्र लढू.
पालकमंत्रीपदासाठी सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे. हे बिनडोकपणाचं लक्षण असून मुख्यमंत्री हतबल आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे निर्णय घेतले आणि मुख्यमंत्र्यांचा अधिकार सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतं ते खातेवाटप करतात, पालकमंत्रीपदं देतात. पण मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर ते परदेशात असताना दिल्लीतून दबाव आणून स्थगिती दिली. हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान आहे. दिल्लीतून अशा प्रकार कोणी दबाव आणण्याच प्रयत्न करत असेल तर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अवमान आहे असे आम्ही मानतो. हा नवीन पायंडा पडताना दिसतोय.
नरहरी झिरवळ यांना गरीब म्हणणं हा गौतम अदानींचा अपमान ठरेल. झिरवळ गरीब वगैरे काही नाहीत. झिरवळ यांना शरद पवारांनी इतक्या शिखरावर नेलं आणि त्यांनीच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. हे गरीबाचे लक्षण नाही. गरीब माणूस हा निष्ठावान असतो, खाल्या मीठाला जागतो.
दावोसला जाऊन जर गुंतवणूक आली असेल तर त्याचे स्वागतच आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते, त्यांनीही 15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याची घोषणा केली होती. हे 15 लाख कोटी रुपये कुठे आलेत? आजही ते सरकारमध्ये आहेत. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकारी, पत्रकार असा मोठा लवाजमा घेऊन ते दावोसला गेले होते. 15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यांचा त्यांचा दावा होता. एक रुपया तरी आला का? दावोसमध्ये साधारणतः एक जत्रा भरलेली असते. या जत्रेमध्ये सर्वच हौशे, नवशे येत असतात. तिथे MoU होतात, प्रत्यक्ष करार होत नाहीत. आता देवेंद्र फडणवीस दावोसला गेले पण जी गुंतवणूक झाली त्यातील बऱ्याचशा कंपन्या या भारतातल्याच आहेत. त्यासाठी तिकडे जाण्याची गरज नव्हती. मग हे 10 लाख कोटींचे करार झालेत ते दाखवा की कुठे जमीन दिली? पुढच्या वर्षी परत हे दावोसला जातील तोपर्यंत यांचा काही हिशोब नाही. एकनाथ शिंदे जेव्हा दावोसला गेले होते त्या कराराचं काय झालं हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं आणि आपण केलेल्या करारांविषयी महाराष्ट्राला माहिती द्यावी अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.