![sanjay raut](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/05/sanjay-raut-1-2-696x447.jpg)
Lok Sabha #ElectionResults नंतर भाजपची ( bharatiya janata party ) अवस्था बिकट होताना दिसत आहे. तर विरोधक आणखी आक्रमकपणे NDA आणि भाजपचा समाचार घेताना दिसत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या नेहमीच्या पण खास शैलित भाजपला लक्ष्य केलं.
नऊ तारखेला नरेंद्र मोदी पुन्हा एकदा शपथ घेणार आहेत या मुद्द्यावरून विचारले असता ‘नऊ तारखेला शपथविधी होऊ द्या. नाकी नऊ येतील सरकार चालवताना’, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला. ‘मुळात एनडीए आहे कुठे? चंद्राबाबू आणि नितीशकुमार… नितीशकुमार तर सगळ्यांचे आहेत आणि चंद्राबाबूही सगळ्यांचे आहेत. आज तुमचे आहेत उद्या आमचे असतील’, अशा शेलक्या शब्दात संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं.
सरकार स्थापन करण्याआधीच जेडीयूने अग्निवीर विरोधात आवाज उठवला आहे. मोदी ज्या गोष्टी आणण्याचं वचन निवडणूक प्रचारात देत होते त्या सर्वांना जेडीयू-टीडीपी विरोध करत आहेत. मोदी तर म्हणत होते की काँग्रेस आणि आम्ही सत्तेत आले तर मुसलमानांना आरक्षण देतील. आता चंद्राबाबू तर मुसलमानांच्या आरक्षणाच्या बाजूने आहेत तर आता तुम्ही काय करणार? असे भाजपसाठी अडचणीचे ठरणारे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
आम्ही सर्वांनी मिळून बहुमत मुक्त भाजप केला!
‘असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर NDA मध्ये चर्चा होणे अजून बाकी आहे. मी वारंवार सांगत आहे, सरकार बनवण्याचा पहिला अधिकार या लोकांचा आहे. मोदींकडे, भाजपकडे बहुमत नाही. मोदी म्हणत होते मी काँग्रेसमुक्त हिंदुस्थान करेन. पण आम्ही सर्वांनी मिळून बहुमत मुक्त भाजप केलं आहे. तरी तुम्ही सरकार बनवू पाहात आहात ही एक विटंबना आहे’, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुन्हा NDA सोबत जाणार का? या प्रश्नावर आम्ही महाराष्ट्र आणि आमच्या पक्षासोबत बेईमानी करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
कंगला प्रकरण: लोकांचा मनातला राग लक्षात घ्या, पण खासदारावर…
भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत यांना महिला कॉन्स्टेबलने कानाखाली लगावली, या प्रकरणी विचारले असता राऊत म्हणाले की, ‘काही लोक मत देतात काही कानाखाली देतात. मला माहित नाही खर काय झालं ते. त्या कॉनस्टेबलने जर सांगितलं की त्यांची आई आंदोलनासाठी बसली होती तर ते खरं आहे आणि आई शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असेल आणि तसं असताना त्यांच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल तर नक्कीच लोकांच्या मनात चीड, संताप येतो, राग येतो. पण जर मोदी म्हणतात की कायद्याचं राज्य आहे तर कायदा हातात नाही घेतलं पाहिजे. पण एका कॉन्स्टेबलने आपल्या आईसाठी कायदा हातात घेतला असेल तर भारत माता ही तिची आई आहे आणि ज्या शेतकरी आंदोलनात त्यांची आई बसली होती ती देखील भारत मातेची सुपुत्री होती. तर कोणी भारत मातेचा अपमान केला आणि कुणाला राग आला, तर त्यावर विचार केला पाहिजे, असं मला वाटतं’.
याबरोबच संजय राऊत कंगना विषयी सहानभूती व्यक्त केली आहे. ‘कंगना या आता खासदार आहेत. खासदारवर अशाप्रकारे हात उचलला नाही पाहिजे. मात्र शेतकऱ्यांचा सन्मान झाला या देशात झाला पाहिजे. लोकांच्या मनात आजही राग आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. जसं मुंबईला कंगनाने पाकिस्तान म्हटलं तेव्हा लोकांच्या मनात राग होता. राग येण्याचा अधिकार फक्त तुम्हाला नाही आम्हालाही आहे. मात्र तरी खासदारावर अशा प्रकारे हात उचलणं योग्य नाही, कारण तो खासदार आहे’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.