गुंड आणि लुटारूंच्या हातातून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ सातपूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी संजय राऊत बोलत होते. महागाई वाढलेली आहे, गॅस सिलिंडर चौदाशे रुपयांना मिळतो अन् हे सरकार लाडकी बहीण योजनेतून दीड हजार रुपये देऊन महिलांची दिशाभूल करीत आहे. सत्तेसाठी जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजपासह महायुतीने महाराष्ट्राला पिछाडीवर नेले आहे. उद्योग आणि रोजगार गुजरातमध्ये पळविले आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचं, कमजोर करण्याचं कारस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा या गुजरातच्या व्यापाऱ्यांनी केले आहे. हे दोघेही महाराष्ट्राचे एक नंबरचे शत्रू आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून मोदी-शहा यांनी महाराष्ट्राचा सूड घेतला आहे. राज्याच्या अस्मितेसाठी, सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, गुंड आणि लुटारूंच्या हातातून राज्याची, देशाची सुटका करा, असे आवाहन त्यांनी केले.