विधानसभा निवडणुकीत सहानुभूती मिळावी म्हणून बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेंचा फेक एन्काऊंटर केला असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच संतोष देशमुख यांचा ज्यांनी खून केला त्यांचा एन्काऊंटर का नाही केला? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.
आज दिल्लीत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा संजय राऊत म्हणाले की, काल महाराष्ट्रात बदलापूर लैंगिक अत्याचारासंदर्भात उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आणि जे ताशेरे ओढले. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नसून खून होता असा जो निष्कर्ष न्यायालयाने काढला आणि त्या पाच पोलिसांवर गुन्हे दाखल केले याला जबाबदार कोण आहे? लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शासन झाले पाहिजे अशी भुमिका संजय राऊत यांनी मांडली.
तसेच, पश्चिम बंगालमध्ये संजय रॉयने अत्याचार आणि खून केला त्याला ताबडतोब जन्मठेप झाली. त्याला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून ममता बॅनर्जी सरकार वरच्या कोर्टात जाणार आहे. या संदर्भातसुद्धा करता आलं असतं असे संजय राऊत म्हणाले. बदलापूर प्रकरणातला खटला ताबडतोब चालवून या संदर्भात संबंधित आरोपीला कठोर शिक्षा देणे हे सहज शक्य होतं. पण त्या आरोपीचं फेक एन्काऊंटर केलं, का? विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला थोडी सहानुभूती मिळावी यासंदर्भात त्यांनी भुमिका घेतली. पाच पोलिसांना फासावर लटकवण्याचे काम त्यावेळी कोणी केलं? या संदर्भात तत्कालीन गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. गृहमंत्री या संदर्भात तुम्ही अंधारात होता? आणि या पाच पोलिसांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय हे हात्याकांड केले का? मग पोलीस आयुक्त कोण होते त्यांना गुन्हेगार ठरवायला पाहिजे. त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होते, जे राज्याचे मुख्यमंत्री होते, तेच ठाण्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या परवानगीशिवाय हे हात्याकांड झाले का? जर झाले असेल तर तत्कालीन पालकमंत्र्यांवरही गुन्हे दाखल केले पाहिजे ही आमची भूमिका आहे. अक्षय शिंदे याचा खून झाला की त्याचा फेक एन्काऊंटर झाला त्याचे दुःख नाही पण ज्या पद्धतीने घडवून त्यावरून महाराष्ट्राच्या जनतेला फसवण्याचा प्रयत्न झाला. असं असेल तर कल्याणमध्ये विशाल गवळी नावाच्या गुन्हेगाराने एका मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला, त्याचा एन्काऊंटर का नाही केला. कारण निवडणूक झाली होती. बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या लोकांचं एन्काऊंटर का नाही केलं. अशा प्रकारे खुनी, अत्याचार करणाऱ्यांना तुम्ही तोच न्याय दिला पाहिजे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.