
गेल्या तीन वर्षांपासून एकनाथ शिंदेआणि त्यांची लोकं ज्या पद्धतीची भाषा वापरत आहात ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कुठल्या शब्दकोशात बसतात हे त्यांनी सांगावं असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक काय म्हणतात त्यावर या देशाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरत नाही असेही संजय राऊत म्हणाले.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, भाजप सरकारने ईद निमित्त मुस्लीम समाजाला शेवई, खजूर आणि ड्रायफ्रूट वाटले जाणार आहे. यावरून संजय राऊत म्हणाले की, ही नरेंद्र मोदींची सौगात. मोदींनी महाराष्ट्रात नकली हिंदुत्ववादी पाळून ठेवले आहेत. त्यांची प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेतली पाहिजे. त्यांचा उल्लेख आमच्या अनिल परबांनी नेपाळी असा केला. असे बरेच लोक महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर ज्यांना मुस्लिमांचे अस्तित्वच मान्य नाही. या देशात मुस्लिमांनी राहूच नये, किंवा मुस्लीम शत्रू आहे, मुस्लिमांना कोणते अधिकार नाहीत, अशा प्रकारची भूमिका घेऊन काही लोक अलीकडच्या काळामध्ये हे लोक या देशातले वातावरण खराब करत आहेत, त्यांनी या मोदींच्या सौगातचे स्वागत केले आहे का? आम्ही स्वागत करतो. शेवटी सण आहे, दिवाळीत महाराष्ट्रात आनंदाचा शिधा दिला, या देशालीत गरीब मुस्लिमांना नरेंद्र मोदींनी हात पुढे केला आहे. ही सरकारची मदत आहे आम्ही त्यावर टीका करणार नाही. पण जे लोक ईदवर, इफ्तारवर कालपर्यंत टीका करत होते, त्यांची यावर प्रतिक्रिया का आली नाही? महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये दिल्लीत काही बाडगे हिंदू आहेत. या निर्णयामुळे त्यांची गोची झालेली आहे. मोदी त्यांना इफ्तार पार्टीतसुद्धा पाठवतील आणि त्यांना जावं लागेल असे संजय राऊत म्हणाले.
या देशातला मुस्लिम समाज आपल्या जवळ आला पाहिजे. 2029 ची लोकसभा किंवा त्या आधीच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला यश मिळणार नाही याची खात्री पटल्यानेच ते आता अशा प्रकारचे निर्णय घेत आहेत. आणि ते जगाला, मुस्लिम राष्ट्रांना दाखवू इच्छितात की आमच्याकडील मुस्लिमांची आम्ही काळजी घेत आहोत. ते आपली प्रतिमा सुधारण्याची ते प्रयत्न करत आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
तसेच एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक काय म्हणतात त्यावर या देशाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरत नाही. आपण गद्दारी केल्यापासून जी वक्तव्यं करत आहात ती कुठल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसतात असेही संजय राऊत म्हणाले. गेल्या तीन वर्षांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांची लोकं ज्या पद्धतीची भाषा वापरत आहात ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कुठल्या शब्दकोशात बसतात हे त्यांनी सांगावं. कुणाल कामराने गेल्या अनेक वर्षांपासून एका व्यासपीठावरून व्यंग केले आहेत. आणि कुणालने प्रत्येकांवर व्यंग केलेले आहे. कुणाल कामराने राहुल गांधी, मनमोहन सिंह, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंवरही व्यंग केले आहे. राजकारणामध्ये या गोष्टी सहन करायच्या असतात. या गोष्टी संयमाने पाहून सोडून द्यायच्या असतात. जो पर्यंत तुमच्यावर व्यक्तीगत स्वरुपाची किंवा बदनामीकाराक टीका होत नाही तोपर्यंत राजकारण्यांनी या टीकेकडे एक मजा म्हणून पहायची असते. गेल्या 60-70 वर्षांपासून आम्ही अशा प्रकराची व्यंगात्मक कविता किंवा भाषणं, लेखन आम्ही पाहत आहोत असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की ही सुपारी आहे. राहुल गांधी किंवा आमच्यावर अशा टीका टिप्पण्या होतात, अशा लोकांकडून झाल्या तेव्हा तुम्ही सुपाऱ्या दिल्या होत्या का? अनेक युट्युबर भाजपने पोसलेले आहेत, ते घाणेरड्या शब्दांत आमच्यावर टीका करत असतात मग त्यांना तुम्ही पोसत आहात का? याचं उत्तर त्यांनी द्यावं. कुणीही समाज तोडत नाही. कुणीही व्यक्तीगत टीका केलेली नाही. आपण समाकारण राजकारणात आहोत, आम्ही टीकेचे घाव सोसले पाहिजे. राजकारणामध्ये तुम्ही काम करताना तुम्हाला प्रत्येकाला खुश ठेवता येत नाही, एक मोठा समाज तुमच्यावर नाराज होतो. आणि तोच मुद्दा पकडून लेखक, पत्रकार, साहित्यिक, कलावंत किंवा स्टॅण्ड अप कॉमेडियन जर त्यावर काही भाष्य करत असतील तर ती समाज तोडण्याची भाषा कशी होऊ शकते अजिबात नाही. तुमच्या राज्यातील व्यंगचित्रकारांना, कॉमेडियन्संना उत्तर प्रदेश सरकारने तुरुंगात टाकले आहे. महाराष्ट्रात तो पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते महाराष्ट्राच्या परंपरेला छेद देत आहेत असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राला अद्याप विरोधी पक्षनेते नाही, ही सुद्धा स्वातंत्र्याची गळचेपी आहे. त्यावर कोणी बोलत आहे का ? महाराष्ट्राध्ये विरोधी पक्षाची नेमणूक का केली जात नाही? हे जर आपण सांगितले असते तर बरे झाले असते. मुख्यमंत्र्यांनी काल जयकुमार गोरे यांची पुन्हा एकदा भलामण केली. मुख्यमंत्र्यांना कुठला छंद किंवा व्यसन जडलेलं आहे की अपराधी आणि गुन्हेगारी सहकारी मंत्र्यांना पाठीशी घालायचं. मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची गंमत वाटते, कोणत्याही चोराला ते पाठीशी घालतात, आणि विधानसभेत तद्दन खोटी माहिती देतात. सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस कोठडीत किंवा पोलीस मारहाणीत झाला नाही असे मुख्यमंत्री विधानसभेत सांगतात. पण नंतर जो अहवाल आला त्यात स्पष्ट म्हटलंय की सोमनाथ सुर्यवंशींची पोलीस कोठडीत हत्या झालेली आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री प्रत्येक ठिकाणी तोंडवर पडत आहेत. जयकुमार गोरे प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर खापर फोडले आहे. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका अत्यंत चूकीची आहे. जयकुमार गोरे हे काय प्रकरण आहे याचा तपास मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे करावा. जयकुमार गोरे ज्या प्रकरणात सुटले असे म्हणतात त्या प्रकरणातील न्यायालयाचा आदेश त्यांनी वाचावा. त्या महिलेला खोट्या प्रकरणात तुम्ही अडकवलं आहे, तुरुंगांत टाकलं आहे ते ठीक आहे पण एका मृत व्यक्तीला जिवंत करून या महायशांनी त्यांची जमीन लाटली आहे. एका मागासवर्गीय मृत व्यक्तीला जिवंत करून त्या व्यक्तीची जमीन लाटणारी व्यक्ती तुमच्या मंत्रीमंडळात आहे आणि तुम्ही त्याची भलामण करता याचा अर्थ या राज्यात तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालत आहात. या राज्यात वाल्मीक कराडपासून जी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे या तुमच्या टोळ्या आहेत असं मला दुर्दैवाने म्हणावं लागतं.
मुंबईला पाकिस्तान म्हणणं हे व्यंग आहे का? मुंबईला पाकिस्तान म्हणणं हे व्यंग कसं असेल हा देशद्रोह आहे. मुंबईला पाकिस्तान म्हटल्यालर भारतीय माणसाला चीड येणार नाही का, ही व्यक्तीगट टीका नव्हती. ही देशाच्या आर्थिक राजधानीवर केलेली ही भयंकर टीका होती. उद्या दिल्लीला कुणी पाकिस्तान म्हटलं तर मी स्वतः जाईन त्याच्यावर हल्ला करायला. हा हिंदुस्थान आहे, देशाच्या कुठल्याही भागाला तुम्ही पाकिस्तान म्हणू शकत नाही.
कुणाल कामराने कुणाचंही नाव घेतलेलं नाही. त्याने कुणावरही व्यक्तीगत टीका केलेली नाही. तरी आ बैल मुझे मार असं का करावं त्यांनी? एकनाथ शिंदे यांच्या भोवती डोकी नसून मडकी आहेत. एकनाथ शिंदे यांच्या अवतीभवती डोकी असती तर त्यांनी हे उपद्व्यवाप केले नसते. एकनाथ शिंदेच्या अवतीभवती रिकामी मडकी आहे आणि त्या मडक्यात कचरा आहे त्याच्यामुळे ही आग लागली. आणि त्या आगीमध्ये एकनाथ शिंदे हे पूर्ण बदनाम झाले आहेत असेही संजय राऊत यांनी नमूद केले.