नगरविकास खातं हे भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा अड्डा, संजय राऊत यांचा मिंधेंवर जोरदार हल्लाबोल

नगरविकास खातं हे भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा अड्डा आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा डम्पिग ग्राऊंड आहे, त्याविषयी आम्ही लवकरच माहिती देऊ असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचं सरकार जाऊन तीन वर्ष झाली. अजूनही ते फडणवीस आणि शिंदेंच्या अटकेच्या कारस्थान, संदर्भात घोळ घालत आहेत. जर त्यांनी गुन्हा केला असेल तर ती किती मोठी व्यक्ती असेल, त्यांना अटक का होऊ नये. आम्हाला ज्यासाठी अटक केली त्यासाठी काय कारणं होती? ती खरी प्रकरणं होती का? हे कोर्टानेच सांगितलं. मग त्यासाठी आम्ही एसआयटी नेमायची आणि यांना अटक करायची का? ठाकरे सरकारने भ्रष्टाचाराच्या शोधासाठी एसआयटी स्थापन केली होती. त्या ह्यांनी आल्याबरोबर रद्द केल्या. स्वतःला अटक होणार असा गोंगाट त्यांनी केला. त्यांचा एक आमदार आरोप करतोय, एका डिसीपीची साक्ष काढली जात आहे. त्या डीसीपीचं कॅरेक्टर बघा. एकनाथ शिंदे हे अटकेला घाबरून भाजपसोबत गेले, त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. मग एसआयटी त्याची चौकशी करणार का? की फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना हाताशी धरून 2019 साली विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केले, त्यांच्यावर पाळत ठेवली, पोलीस खात्याकडून आमदारांना धमक्या द्यायला लावल्या. हा एक गुन्हा नोंद झाला की त्याच्यामुळे त्यांना भिती वाटत होती की हे सगळं प्रकरण धागेदोरे माझ्या पर्यंत येतील आणि मला अटक होईल? हा तर सगळ्यात मोठा गुन्हा होता. मग आल्याबरोबत ती एसआयटी का रद्द केली? हे त्या शहाण्यांनी सांगावं. जे शहाणे परत आले आहेत ना त्यांनी हे सांगावं की तुम्ही हे सगळे गुन्हे रद्द करून काय मिळवलंत? तपास पूर्ण व्हायला हवा होता. म्हणजे कळालं असतं कोण कुणाला का अटक करत होतं? तु्म्ही
कायद्याचे रक्षणकर्ते आहात. वाल्मीक कराडला अटक करायला एवढा वेळ लागला आणि ते आम्हाला सांगतात की आम्ही त्यांना अटक करणार होतो. आपल्या पक्षाच्या गुन्हेगारांना अटक करायला जे लोक टाळत आहेत आणि ज्यांना खरोखर अटक करण्याची गरज होती त्यांना मंत्रीमंडळात ठेवलं जातंय. असे हे सरकारचे लोक आता एसआयटी स्थापन करत आहे की आम्हाला अटक करणार होते, ज्यांनी गुन्हा केला होता आणि भविष्यात गुन्हा करतील त्यांच्यावर कायद्याने कारावाई झाली पाहिजे, तुम्ही कायद्याच्या वर आहात का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

तसेच नगरविकास खातं हे भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा अड्डा आहे, भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा डम्पिग ग्राऊंड आहे, त्याविषयी आम्ही लवकरच माहिती देऊ असेही संजय राऊत म्हणाले.