धर्मवीर आनंद दिघे यांच्या पवित्र आनंदाश्रमात मिंध्यांनी लुटीचा पैसा उधळून धिंगाणा घातला, राज्याच्या संस्कृतीला कलंकित करण्याचे काम केले. आज आनंद दिघे असते तर त्यांनी या एकेकाला हंटरने फोडून काढले असते, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.
नाशिक येथे शनिवारी खासदार संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ठाणे येथील आनंदाश्रमात धर्मवीर आनंद दिघे यांच्या आसनासमोर नोटा उधळणाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून आम्ही सगळेच अस्वस्थ झालो, असे खासदार संजय राऊत म्हणाले. अशा प्रकारचा धिंगाणा हा फक्त भ्रष्टाचाराच्या, लुटीच्या पैशातूनच केला जातो. बारमध्ये उडवतात त्याप्रमाणे पैसे पवित्र धार्मिक ठिकाणी उडवले जात नाहीत. पैसे उडवणारे कोण आहेत, हा पैसा आला कुठून, याची चौकशी झाली पाहिजे. स्वतःला आनंद दिघे यांचे चेले मानणारे मुख्यमंत्री किंवा अन्य कोण असतील त्यांनी यावर भाष्य केले पाहिजे. ते खरोखर धर्मवीर दिघे यांचे शिष्य असते तर असे कृत्य केलेच नसते. हा आनंद दिघे यांचा वारसा नाही. ते आज असते तर भिंतीवरचा हंटर काढून एकेकाला फोडून काढले असते, असा संताप त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, उपनेते सुनील बागुल, संपर्पप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्पप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, गणेश धात्रक आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांसह सरकारवर पळून जाण्याची वेळ येईल
जनतेने जाब विचारताच कार्यकर्त्याच्या दुचाकीवरून पळालेल्या मंत्री गिरीश महाजन यांच्या व्हिडीओविषयी खासदार संजय राऊत म्हणाले की, सरकारबद्दल राज्यातील जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. एक मंत्री काय मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकारवरच निवडणुकीपूर्वी पळून जाण्याची वेळ येईल, अशी टीका त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड येथे ईव्हीएम प्रचार रथाचा शुभारंभ केला, या नियमबाह्य वर्तनासाठी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करायला हवी. पण, या राज्यात फक्त विरोधकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो, सत्ताधाऱ्यांवर नाही, असे संजय राऊत म्हणाले.