भाजपचा माफिया मित्रांना सांभाळण्याचा प्रयत्न, बीड पॅटर्न महाराष्ट्रात लागू झाल्यास राज्य खतम होईल; संजय राऊत यांचा गंभीर इशारा

भाजप ज्या पद्धतीने माफिया मित्रांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे माफियाकरण होईल असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच बीड पॅटर्न जर महाराष्ट्रात लागू झाला तर तुमच्या हातून हे राज्य सटकून जाईल, हे राज्य खतम होईल असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

दिल्लीत पत्रकरांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपचा पराभव करण्यासाठी आपापासांतले मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे होते. काँग्रेस आणि आप लोकसभेला एकत्र लढले आणि एकत्र प्रचार केला. आमच्या व्यासपीठावर केजरीवाल होते आणि केजरीवाल काँग्रेसच्या व्यासपीठावर होते. पण दिल्लीत काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही ठरवण्याचा जो प्रचार सुरू केला आहे, त्याला शिवसेनेचे समर्थन नाही. आम्ही एकत्र आहोत, एकत्र रहायला पाहिजे. टीका टिपण्णी होऊ शकते, राजकीय विरोध होऊ शकतो. पण केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला देशद्रोही ठरवणे हे कुणालाही मान्य होणार नाही.

तसेच बीडमध्ये खेळ चालला आहे, लोकांना फसवण्याचा. ज्या पद्धतीने आरोपी, पोलीस, राजकारणी यांचे एकत्रित जेवणावळीचे, बैठकीचे फोटो येत आहेत. बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण आणि माफियागिरीरचा फार्स सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझे आवाहन आहे. भाजप ज्या पद्धतीने माफिया मित्रांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे माफियाकरण होईल. बीड पॅटर्न जर महाराष्ट्रात लागू झाला तर सगळ्या जिल्ह्यात बीड पॅटर्न लागू होईल आणि तुमच्या हातून हे राज्य सटकून जाईल, या राज्याची बदनामी होईल, हे राज्य खतम होईल. माझं गृहमंत्र्यांना आवाहन आहे. बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे. आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण हे बीडबाहेर चालवलं पाहिजे. एसआयटीमध्ये जे जे पोलीस आहेत ते आरोपीशी संबंधित आहेत की नाही याची चौकशी करावी. पूर्ण पोलीस खातं आणि प्रशासन पोखरून त्यांनी ताब्यात घेतलं होतं असेही संजय राऊत म्हणाले.

बीड प्रकरणाचा हा तपास म्हणजे धुळफेक सुरू आहे असे संजय राऊत म्हणाले. अजूनही आरोपींना वाचवण्याचे प्रकार सुरू आहेत. आणि हे वाचवले जातील, खरे आरोपी बाहेर आहेत. सुरेश धस बोलतात आणि माघार घेतात. धस यांना दट्ट्या आला की ते माघार घेतात. धस हे हिंमतीने उभे राहिले असतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राला बीड पॅटर्नचा कलंक लागला आहे तो धुवून काढण्यासाठी एक आमदार नव्हे तर या महाराष्ट्राचा मराठी नागरिक म्हणून त्यांनी निडर आणि बेडरपणे आपली लढाई चालू ठेवली पाहिजे, आम्ही सर्व त्यांच्यासोबत उभे राहू असेही, संजय राऊत म्हणाले.

राज्य सरकारकडून फसवणूक सुरू आहे. भाजपचा जाहीरनामा बघा त्यात काय घोषणा आणि काय वचनं दिली आहेत. त्यात कर्जमाफीचे वचन आहे आणि कृषीमंत्री म्हणतात की कर्जमाफी शक्य नाही. दादर रत्नागिरी ट्रेन बंद करून दादर गोरखपूर ट्रेन सुरू केली आहे. यावर भाजप आणि डुप्लीकेट शिवसेनेने उत्तर द्यावं. आम्ही ती गाडी अडवू, आम्ही जर मनात आणलं तर गाडी रुळावरून पुढे जाणार नाही. पण जे स्वतःला महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक मानत आहेत आणि सत्तेत बसले आहेत, ते आणि अजित पवार काय करत आहेत असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. तसेच ज्या पंतप्रधानांनी आपल्या परदेश दौऱ्यांमध्ये राष्ट्राध्यक्षांना आणि त्यांच्या बायकांना सरकारी तिजोरीतून वीस हजार डॉलर्सचे हिरे भेट दिले, ते पंतप्रधान स्वखर्चाने दिवाळी साजरी करतील का? असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.