
आपण गृहमंत्री आहोत का हे फडणवीसांनी स्वतःला विचारावं , कायदा सुव्यवस्थेवरून संजय राऊत यांचा निशाणा राज्यात आणिबाणीपेक्षा भयंकर परिस्थिती आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला विचारावं की ते गृहमंत्री आहेत की नाही असेही संजय राऊत म्हणाले.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी स्वतःला विचारावं की ते गृहमंत्री आहेत की नाही. कायद्याची ज्या पद्धतीने चिरफाड होतेय, कायदा उद्ध्वस्त होतोय दररोज. भाजपच्या लोकांनी स्वतःला प्रश्न विचारावा की माझ्या पक्षाचे लोक फडणवीसांना गृहमंत्री मानतात की नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही हे त्यांनी स्वतःला विचारावं आणि मग दुसऱ्याला ज्ञान द्यावं.
कुणाल कामराच्या शो ला आलेल्या प्रेक्षकांची चौकशी सुरू आहे. हा मुर्खपणा आहे असे संजय राऊत म्हणाले. ते लोक कायद्याला गाढव समजतात आणि कायद्याचा गैरवापर करत आहेत. अशा पद्धतीने देशात कुठल्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहणार नाही. तुम्ही प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवताय? कोणता कायदा आहे महाराष्ट्रात? हे आणिबाणीपेक्षा भयंकर आहे. इंदिरा गांधी यांची आणिबाणी ही यांच्यापेक्षा 100 पट उत्तम होती. अशा प्रकारचा कारभार राज्यात सुरू आहे आणि म्हणे हे भंपक आणि बोगस लोक आणिबाणीविरोधात लढले . इंदिरा गांधी यांच्या काळात चित्रपट बघायला गेलेल्या लोकांना अटका होत नव्हत्या असेही संजय राऊत म्हणाले.