
संतोष देशमुख यांचा ज्यांनी खून केला त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपींच्या आकाला वाचवण्यासाठी राज्यात प्रयत्न करत होते असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच राज्याचे गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले म्हणून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची अवस्था दारूण झालेली आहे असेही संजय राऊत म्हणाले.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. ही गोष्ट खरी आहे आणि या आरोपीच्या आकाला वाचवण्यासाठी या राज्याचे गृहमंत्री काही काळ प्रयत्न करत होते. आज ते साताऱ्याच्या एका आकाला वाचवत आहेत किंवा अन्य काही लोकांना वाचवत आहेत. कामराच्या हॅबिटॅट स्टुडिओवर ज्यांनी हल्ला केला, आणि जे कुणाल कामराला जे ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जातंय. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची अवस्था दारूण झालेली आहे. याचे कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले आहेत अशी टीका संजय़ राऊत यांनी केली.
तसेच छत्रपती ताराराणी यांनी औरंगजेबाला झुंजवलं. मराठ्याचं शौर्य काय असतं हे ताराराणी यांनी दाखवलं होतं. ज्या लोकांना औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची आहे, त्यांनी ताराराणीच्या स्मारकाकडे नजर टाकावी आणि आपलं काही चुकतंय का हे पाहा असे संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष होते, तसा ठराव मंजूर झाला आहे आणि तशी मान्यता आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या त्यांचा फोटो कोणीही वापरू शकतो. म्हणूनच एकनाथ शिंदेंचं फावलं. महात्मा गांधी असतील किंवा लोकमान्य टिळक, नेहरु असतील. आता बाळासाहेब ठाकरे हे या राष्ट्रपुरुषांच्या यादीत आहेत असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.