वाल्मीक कराड हा भाजपचा माणूस, भाजपने छोटे मासे पकडून मोठा मासा जाळ्यात ठेवला आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच वाल्मीक कराड काही दिवसांतच बाहेर येईल असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार एक विधान करत आहेत की आम्ही कुणालाही सोडणार नाही. पण मुख्य आरोपीला सोडलं आहे आणि मुख्य आरोपीला सोडून सर्व आरोपींना मोक्का लावला आहे. भाजपची ही राज्य करण्याची पद्धत आहे. मुख्य आका पक्षात ठेवायचा आणि त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांवर कारवाई करायची. बीड आणि परभणीत जे घडलंय ते अतिशय भयानक आहे. त्यावर आज सामनात मी स्वतः भाष्य केले आहे असे संजय राऊत म्हणाले.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय करतील अशी आमची अपेक्षा होती. कारण ते वारंवार न्याय आणि सत्याची भाषा करतात. कुणालाही सोडणार नाही, खपवून घेणार नाही असे फडणवीस म्हणतात. पण त्यांनी खपवून घेतलेले अनेक लोक गुन्हेगार आणि भ्रष्टाचार त्यांच्याच बाजूला बसले आहेत. वाल्मीक कराड हा त्यांच्याच पक्षाचा आहे. त्यामुळे त्यांनी खपवून घेतलेले आहेत आणि लहान मासे पकडले असून मोठा मासा जाळ्यात ठेवला आहे. हा मासा 10-15 दिवसांत बाहेर येईल. वाल्मीक कराडवर साधा खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. कोण कुणाला वाचवतंय आणि हे माफियांचं राज्य कसं झालं आहे? शिकागोमध्ये असं राज्य एकेकाळी चालत होतं. राज्यकर्ताच माफियांचा समर्थक होता, राज्यकर्ताच माफियांना मदत करत होता. अशा प्रकारे शिकागोमध्ये माफियांचं राज्य सुरू झालं होतं. राज्यात अशाच प्रकारचा कारभार सुरू आहे हे बीड आणि परभणीच्या घटनेवरून दिसतोय. बीडचे आमदार सुरेश धसे हे भाजपचेच आहेत. संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत. हे सर्व पक्षाचे लोकं भलेही विरोधी पक्षाचे असतील, तुमच्याही पक्षाचे लोक आक्रोश करत आहेत. तरी जर या राज्याचे मुख्यमंत्री ऐकत नसतील तर, समजून घेत नसतील तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मुख्य आरोपींना वाचवायचं आहे. आणि तुम्ही कारवाईचं फक्त ढोंग करत आहेत असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
जे लुटले आहेत, ज्यांची फसवणूक झाली आहे, ज्यांना दहशतीने मारले आहे त्यांच्या कुटुंब हळूहळू पुढे येतील. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना संरक्षण दिले पाहिजे. या उलट मुख्यमंत्री आरोपींना वाचवत आहे हे मला दुर्दैवाने म्हणावंस वाटतं. आणि हे जे उद्योग आहेत ते रिकामटेकडेपणाचे उद्योग असतात. राज्य करायचं नाही, घटना आणि संविधानाची बूज राखायची नाही आणि मग फक्त पक्ष आणि सत्ता टिकवण्यासाठी माफियांच्या राज्याला संरक्षण द्यायचं. एकेकेळी मुंबईतले अंडरवर्ल्डमधले लोक प्रोटेक्शन मनी घ्यायचे. आता सरकारच या लोकांकडून प्रोटेक्शन मनी घेत आहे का हे पहावं लागेल.
महाराष्ट्र शांतच आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र स्तब्ध आहे. महाराष्ट्र काही बोलतच नाही. बीड आणि परभणीमध्ये अशांतता आहे. शरद पवार साहेब तिथे जाऊन आले. आम्ही तिथे गेलो नाही कारण आम्हाला शांतता हवी आहे. आणि पवार साहेबांच्या पक्षाचे नेतेच आंदोलन करून मोर्चे काढत आहेत. त्यांनी सांगायला हवं की खून विसरून जा. या राज्यात शांतता नांदायला हवी आणि त्यांच्यासोबत सहमत आहोत. पण गुंडगिरीली समर्थन देऊन शांतता नांदणार नाही. वाल्मीक कराडसारख्या माणसाला संरक्षण देऊन शांतता नांदणार नाही. आणि संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशींचा खुन पचवून शांतता नांदणार नाही असेही संजय राऊत यांनी नमूद केले.