मर्जीतल्या ठेकेदारांसाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जातोय का? संजय राऊत यांचा सवाल

कर्जबाजारी महाराष्ट्राची तिजोरी या लोकांनी महिलांची मतं विकत घेण्यासाठी वापरली, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच मर्जीतल्या ठेकेदारांसाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जातोय का? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आनंदाचा शिधा ही योजना सरकारने बंद केली आहे. आता लाडकी बहीण योजनाही बंद करतील. हे राज्य कसं चालवणार हा प्रश्न आहे. कर्जबाजारी महाराष्ट्राची तिजोरी या लोकांनी महिलांची मतं विकत घेण्यासाठी वापरली. जाहीरनाम्यातील त्यांच्या ज्या प्रमुख घोषणा आहेत, लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या त्यांच्या घोषणा आहेतच. या घोषणांचं काय झालं याचं उत्तर राज्याच्या जनतेला मिळालं पाहिजे. ८ लाख हजार कोटींच्या वरचं कर्ज हा कर्जाचा डोंगर तुम्ही कसा करणार? राज्याच्या दरडोई माणसावर किती कर्ज आहे याचा हिशोब करा. तुमचं कर्ज या राज्याची जनता फेडणार आहे असे संजय राऊत म्हणाले.

शक्तीपीठ मार्गाची मागणी कोणी केली होती असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. शक्तीपीठ मार्गाची मागणी गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते बनवणाऱ्या ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात जे पैसै उकळले गेले. समृद्धी मार्ग असेल किंवा शक्तीपीठ मार्ग असेल या ठेकेदारांकडून हजारो कोटी रुपये आधीच काढून घेतले. कंत्राट देण्यात आली आणि शेकडो रुपये काढले गेले. ते निवडणुकीत किंवा आमदार, खासदार विकत घेण्यासाठी वापरले असतील. शक्तीपीठ महामार्गातील शेतकरी जमीन अधिग्रहणाविरोधात आहेत. आणि हा शेतकरी शक्तीपीठ महामार्गाविरोधात रस्त्यावर आहे असेही संजय राऊत म्हणाले.

फडणवीसांना 100 शेतकऱ्यांनी हा मार्ग व्हावा म्हणून निवेदन दिले. हे शेतकरी भाजपचे एजंट असावेत. त्यांच्या माध्यमातून या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु असावेत. सामान्य शेतकऱ्याला आपली जमीन द्यायची नाहिये. मुळात शक्तीपीठाची गरजच काय? असा प्रश्न सगळेच विचारत आहेत. आम्ही विरोध करत नाही आहोत. शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे, तुमच्याकडे 100 शेतकरी आले म्हणून एक चुकीच्या योजनेचे समर्थन होऊ शकत नाही. तुम्ही महाराष्ट्राला पटवून द्या की ही योजना का महत्त्वाची आहे. हा शक्तीपीठ मार्ग का महत्त्वाचा आहे कारण काही तुमच्या मर्जीतल्या ठेकेदारांना काम मिळावं ते मालामाल व्हावे आणि त्या पैश्यातून निवडणूक लढवावी म्हणून या शक्तीपीठासारख्या योजना आहेत का?

बलुचिस्तान ट्रेन हायजॅक प्रकरणात भारताचा सहभाग आहे असा आरोप पाकिस्ताने केला आहे. भारताचा एवढा मोठा हात असता तर चीनने 40 हजार वर्गकिमी जमीन बळकावली आहे ती परत घेतली असती. अरुणाचलमधून चीनला हुसकावून लावलं असतं. हा पाकिस्तानचा अंतर्गत विषय आहे. यात भारताला त्यांनी खेचू नये.

तसेच होळीला लाऊडस्पीकर लावायला परवानगी मिळत नाही, उद्या गणेशोत्सव येत आहे. पीओपीच्या मुर्तींवर बंदी आणलेली आहे. हे कसलं हिंदुत्व? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. वर्षातून एकदा येणाऱ्या सणांवर बंधनं आणत आहात. यापूर्वी असं काही झालं नव्हतं. आमच्या राज्यात हिंदुंचे सण खुल्या वातावरणात होतील, हे तुम्ही सांगत होतात ना, मग आता काय झालं? पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यात महाकुंभमध्ये लोकांना स्नान का करायला लावलं. तुम्हाला पर्यावरणाची इतकी काळजी आहे राष्ट्रीय हरित लवादाचा अहवाल असतानाही त्या गटारगंगेत कोट्यवधी लोकांना का डुबकी मारायला लावली? आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाची गोष्ट सांगता असेही संजय राऊत म्हणाले.