मुंबईत बांगलादेशींची घुसखोरी हे केंद्र सरकारचं अपयश अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीपुर्वी बांगलादेशी मुद्द्यावरून भाजपची नौटंकी सुरू आहे असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सैफ अली खानबद्दलचा पोलिसांचा दावा हा राजकीय दावा आहे. जर बांगलादेशी मुंबईत घुसले असतील आणि ते अशा प्रकारचे गुन्हे करत असतील तर त्याला सर्वस्वी हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा जबाबदार आहेत. बांगलादेशी आले कसे, घुसले कसे, गेल्या दहा वर्षात मुंबईकरांमध्ये पोहोचले कसे? यासाठी जबाबदार कोण? दिल्लीमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, मुंबईत बांगलादेशी आहेत. बांगलादेशी चाकू घेतो आणि अत्यंत सुरक्षित सैफ अली खानच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला करतो, हा सगळा प्रकार अत्यंत रहस्यमयी आहे. तुम्ही काहीतर लपवत आहात आणि त्याचे खापर दुसरीकडे फोडत असाल तर ते चुकीचे आहे. मग या भाजपच्या लोकांना मला असे म्हणायचे आहे की, हा भाजपचा डाव आहे. बीडमध्ये संतोष देशमुख यांचा खून झाला तो बांगलादेशी आहे का? सोमनाथ सुर्यवंशींचे खुनी बांगलादेशी आहेत का? जरा डोकं ठिकाणावर ठेवून बोला, चिलीम मारून बोलू नका. बांगलादेशी हा या देशाला धोका आहे. बांगलादेशी, रोहिंगे यांना ताबडतोब या देशातून बाहेर काढलं पाहिजे. सगळ्यात आधी पंतप्रधान मोदी यांनी शेख हसीना यांना बांगलादेशी म्हणून जो आश्रय दिला आहे, त्यांना बाहेर काढता का आधी. प्रत्येक गोष्टीत धर्माचे राजकारण करताय. हा किरीट सोमय्या तो गेला तिथे बांगलादेशींकडे. हिंमत असेल तर संतोष देशमुख यांचा खुन केला, परभणीत पोलीस कोठडीत सोमनाथ सुर्यवंशीला कोणी मारलं हे विचारा आधी. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून हे बांगलादेशी, बांगलादेशी करताय. बांगलादेशविरोधात आम्ही सर्वात आधी मोहीम सुरू केली होती. तेव्हा आम्हाला भाजपने बोलू दिलं नाही, तेव्हा भाजपचं सरकार होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध खराब होतील असे म्हणाले होते.
आता जर मुंबईत बांगलादेशी घुसले आहेत तर ही अमित शहा यांची जबाबदारी आहे, त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांचा राजीनामा द्यायला सांगा. मुंबईच्या भाजप नेत्यांनी शिष्टमंडळ बनवावं आणि पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी. आणि सर्व बांगलादेशींना हाकलून लावण्याची मागणी करावी. शेख हसीना यांच्यापासून सुरुवात करावी. भाजपचे नेते नौंटकी करत आहेत. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक आल्याने लोकांना घाबरवत आहेत. लोकांच्या मनात भिती निर्माण करण्याचे काम सुरू आहे. बांगलादेशींशी लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत असे संजय राऊत म्हणाले.
मी अनेक वर्ष पत्रकारितेत आहे. माझी सुरुवात ही क्राईम रिपोर्टर म्हणून झाली होती. या मुंबईत, पोलिसांत आणि गुन्हेगारीत काय चालतं याचा अंदाज येतो. सैफ अली खानवर जो हल्ला झाला त्यावर मी काही बोलणार कारण तपास सुरू आहे. पण त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपवाले करत असतील, कुणाला बदनाम करत असतील इतर पक्षांना तर ते चुकीचे आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास पोलीस करत आहेत भाजप नाही. भाजपने वेगळी एसआयटी निर्माण केली आहे का? कालपर्यंत सैफ अली खान तुमच्यासाठी लव जिहादचा प्रतीक होता. त्याचा मुलगा तैमुरवर हल्ला करत होतात. आज त्यांचा पुळका आलाय. म्हणे आंतरराष्ट्रीय कट, कसला आंतरराष्ट्रीय कट? या मुंबईत दररोज सामान्य माणसांवर, महिलांवर 100 हल्ले होत आहेत. तुम्ही अपयशी आहेत, यासाठी राज्याचे आणि देशाचे गृहमंत्रालय अपयशी आहे. जर मुंबईत रोहिंगे आणि बांगलादेशी आले असतील तर अमित शहांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. तसेच बॉलिवूड सर्वात जास्त सुरक्षित आहे, महाराष्ट्रातल्या बॉलिवूडला अंडरवर्ल्डकडून धोका होता, ते काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनोहर जोशी यांच्या सरकारने पूर्णपणे मोडून काढलं असेही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.