
बाळा नांदगावकर यांनी आणलेले गंगाजल आपण नाकारले असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. हेच विधान दुसऱ्या नेत्याने केले असते तर भाजपच्या ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी थयथयाट केला असता अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच राज ठाकरे यांच्या मताशी भाजप आणि मिंधेंचा गट सहमत असतील. यावर त्यांनी मत व्यक्त केलं पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे हे भाजपचे सहकारी आहेत. आणि राज ठाकरे यांनी मधे भाजपसोबत हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे. अचानक ते हिंदुत्वावादी झालेले आहेत. आता राज ठाकरे यांच्या जागी इतर कोणता नेता असता, सपाचा, काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा असता तर किंवा आमच्यापैकी कुणी नेता असता तर या विधानावर भाजप, मिंधेंची सेना त्यांनी थयथयाट केला असता की कसा हिंदुंचा अपमान केला म्हणून. मी राज ठाकरे यांच्या विधानावर मत व्यक्त करत नाहिये. प्रत्येका भावना आणि प्रत्येकाची मतं आहेत. राज ठाकरेंना वाटलं ते बोलले. हेच विधान आणखी कुणी केलं असतं तर याच भाजपच्या ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी थयथयाट केला असता. हेच जर आणखी कुणी बोललं असतं तर रस्त्यावर निषेधाचे मोर्चे काढले असते. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष भाजपसोबत काम करतोय. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मताशी भाजप आणि मिंधेंचा गट सहमत असतील. यावर त्यांनी मत व्यक्त केलं पाहिजे. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. आम्ही जरी हिंदुत्ववादी असलो तरी आम्ही पुरोगामी आहोत. आमचं हिंदुत्व हे नकली किंवा ढोंगी नाही. किंवा धर्मांध असलेलं हिंदुत्व नाहिये. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं हिंदुत्व हे पुरोगामी हिंदुत्व आहे. जर कुणी पुरोगामी विधान करत असेल तर महाराष्ट्र पुरोगामीच आहे असेही संजय राऊत म्हणाले.
रवींद्र धंगेकर आज शिंदे गटात जाणार आहेत, त्यांना शुभेच्छा असे संजय राऊत म्हणाले. धंगेकरांसारख्या कार्यकर्त्याला हा निर्णय घ्यावा लागला, हे तळागाळातल्या कार्यकर्त्याला, ज्याला पक्षाने भरपूर काही दिलं असतं, त्या कार्यकर्त्यांना धक्का असतो. सत्तेवर असल्यावरच कामं होतात हा दावा चुकीचा आहे. धंगेकरांचं संपूर्ण राजकारण हे विरोधी पक्षात गेलेलं आहे. आणि विरोधी पक्षानेच धंगेकर निर्माण केला आहे. संघर्षातून निर्माण केलेले धंगेकर जेव्हा सत्तेच्या वळचणीला जाऊन बसतात तेव्हा खरा धंगेकर संपतो. हा नवीन धंगेकर आहे असेही संजय राऊत म्हणाले.