दाऊदची संपत्ती मुक्त करतात, राष्ट्राला संपत्ती अर्पण करणाऱ्या पं. नेहरूंच्या संपत्तीवर टाच आणतात; संजय राऊत यांचा घणाघात

राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये नरेंद्र मोदींवर टीका केली. ते दिल्लीत पोहोचलेसुद्धा नव्हते तोवर नॅशनल हेराल्डची संपत्ती जप्त करण्याची नोटीस निघाली असे विधान शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच भाजप सरकार दाऊदची संपत्ती मुक्त करतात पण हेच सरकार राष्ट्राला संपत्ती अर्पण करणाऱ्या पं. नेहरूंच्या संपत्तीवर टाच आणतात असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसैनिकांवर जे खोटे खटले दाखल केले जातात आणि जी स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे त्या संदर्भात असीम सरोदे मार्गदर्शन करतील. जो राजकीय विरोधक असतील त्याला जर कमजोर करायचा असेल त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर खोटे खटले दाखल करायचे, त्याला अडकवून ठेवायचं. हा आमच्या नागरी स्वातंत्र्यावर हल्ला आहे. राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये नरेंद्र मोदींवर टीका केली. ते दिल्लीत पोहोचलेसुद्धा नव्हते तोवर नॅशनल हेराल्डची संपत्ती जप्त करण्याची नोटीस निघाली. पंडित नेहरुंनी हे स्थापन केलेले वृत्तपत्र आहे, गांधी कुटुंबीयांशी त्याचा संबंध आहे. गांधी कुटुंबीयांनी पदरचे पैसे खर्च करून हे वृत्तपत्र चालवलं. पण मनी लॉण्ड्रिगने पैसे आले असे दाखवून हे वृत्तपत्र त्यांनी ताब्यात घेतलं असं सांगितलं. मला आश्चर्य वाटतं की एका बाजूला तुम्ही दाऊद इब्राहिमची संपत्ती तुम्ही मुक्त करत आहात. शरद पवार यांचे एकेकाळचे राईट हॅण्ड प्रफुल पटेल हे आता भाजपसोबत आहेत. त्यांची संपत्ती ईडीने जप्त केली होती, का? कारण दाऊद इब्राहिम आणि इक्बाल मिरची यांच्या व्यवहारातून ही संपत्ती निर्माण झाली होती, म्हणून ईडीने ही संपत्ती जप्त केली होती. पण प्रफुल पटेल हे भाजपसोबत गेल्यामुळे मोदी सरकारने ही दाऊदची 1100 कोटी रुपायांची संपत्ती मुक्त केली. बरं हे मी नव्हे तर खुद्द नरेंद्र मोदींनी सांगितले आहे की प्रफुल पटेलचे इक्बाल मिर्चीसोबत संबंध होते. तुम्ही अजित पवारांची संपत्ती जप्त केली. ते भाजपसोबत गेले आणि त्यांची संपत्ती मुक्त केली. पण पंडित नेहरुंच्या संपत्तीवर त्यांनी टाच आणली. ज्या पंडित नेहरूंनी आनंदभवनसारखं राहतं घर देशाला अर्पण केलं, तुम्ही त्यांची संपत्ती जप्त करता आणि दाऊदची संपत्ती मुक्त करता. हे सुडाचं राजकारण सुरु आहे, त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी असीम सरोदेंना बोलवलं आहे असे संजय राऊत यांनी सांगितले.

तसेच काल आम्हाला एक शिक्षिका भेटल्या. समाज कल्याण विभागात त्या मुख्याध्यापिका होत्या आणि निवृत्त झाल्या. त्यांना काही लाभ मिळाले नाही. घरामध्ये लग्न कार्य, शिक्षण आहे. त्यांचे 8 हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला वळवले. ही अशी परिस्थिती आहे राज्याची. चंद्रकांत पाटलांनी याच्यावरती लक्ष घातलं पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.

तसेच मेहुल चोक्सीला अटक केली ही चांगली बाब आहे. आम्ही सातत्याने ती मागणी करतोय की नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांना अटक केली पाहिजे, दाऊद इब्राहिमलाही अटक करून आणलं पाहिजे, कारण भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.