औरंगजेब कबरीतून काढून आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला पण तो त्यांच्यावरच उलटला, संजय राऊत यांचा घणाघात

मोदी शहांना शिव्या घालणारे आज भाजपचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडेर झालेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच औरंगजेब कबरीतून काढून आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला पण तो त्यांच्यावरच उलटला असेही संजय राऊत म्हणाले.

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, भाजपमधले हे लोक बाडगे आहेत. त्यांनी वीर सावरकरांवर चिखलफेक केली आहे, त्यांनी हिंदुत्वावर, मोहन भागवतांवर चिखलफेक केली आहे. आणि आज हे यांचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडेर आहेत. ही पोरं टोरं जी हिंदुत्वावर थुंकले, वीर सावरकरांना ज्यांनी अपमानित केले सरसंघचालक मोहन भागवतांवर अपशब्द काढले, मोदी शहांना शिव्या घातल्या ते आज भाजपचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडेर झालेत या सारखं हिंदुत्वाचं दुर्दैवं नाही.

औरंगजेब प्रकरण शिजवण्याचा आणि पेटवण्याचा प्रयत्न झाला. आणि हे प्रकरण त्यांच्यावरच उलटलं. नागपुरात दंगल झाली, देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ही दंगल घडवण्यात आली. हे देवेंद्रजींनाही अपेक्षित नसेल की हे प्रकरण माझ्याच मतदारसंघात होईल. मुख्यमंत्र्यांना कमजोर ठरवण्यासाठी या जागेची निवड कोणी केली? हा खरा तपासाचा विषय आहे. ही दंगल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडवायची योजना होती, पण ठिणगी कुठे टाकली नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात. या मागे कोण आहे, कुणाचा इंटरेस्ट आहे हा एक तपासाचा विषय आहे असे संजय राऊत म्हणाले.

ज्यांना हिरव्या रंगाबद्दल एवढा राग आहे, मग तुमच्या झेंड्यातून हिरवा रंग काढून टाका, ही सर्व हिरवळ आहे ती बेचिराख करून टाका. हा हिरवा रंग तुम्ही नष्ट करणार आहात का? हे लोक अत्यंत मुर्ख लोक आहेत, त्यांना या हिंदुत्वाशी आणि देशाशी काही देणेघेणे नाही. हे बिनडोक लोक आहेत आणि ही बिनडोक लोकं भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांना पवित्र केले आहे, त्याची फळं भाजप आणि देश भोगतोय.

महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा दंगली होतात त्यासाठी जे उत्तेजन दिलं जातं मंत्र्यांच्या वक्तव्यातून तेव्हा हे महाशय म्हणतात की माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. ही जर मंत्र्यांची भाषा असेल आणि राज्याचे गृहमंत्री ऐकत असतील तर महाराष्ट्र पेटवण्याला तुमचे एक प्रकारे समर्थन आहे. संसदेत हा विषय आम्ही नक्की मांडू. महाराष्ट्र कोण आणि का पेटवतंय. दिल्लीतून त्यांना प्रेरणा मिळतेय का? यावर नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी सांगावं असेही संजय राऊत म्हणाले.

आरोग्य खात्यात गेल्या 5 वर्षात सर्वात मोठे घोटाळे झाले आहेत. आरोग्य मंत्री कालचे असो वा आजचे. हा 11 कोटीचा घोटाळा काहीच नाही. गेल्या महिन्यात 370 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. अॅम्बुलन्स घोटाळा, औषध घोटाळा अशी अनेक प्रकरणं आहेत. आरोग्य खात्यातील बढत्या आणि बदल्या घोटाळा आहे. तानाजी सावंत यांच्यावर पुराव्यांसह थेट आरोप झाले आहेत. यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत.

औरंगजेबाच्या कबरीची उत्खनन करायची काय गरज होती? मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांची वक्तव्यं तपासावीत. भाजपचे आमदार, खासदार, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विधानसभा, विधानपरिषदेतल्या आमदारांवर तुम्ही काय कारवाई करणार?

गृहमंत्री म्हणून फडणवीस ते आधी अपयशी ठरले. गृहमंत्र्यांचे काम फक्त विरोधकांवर नजर ठेवणं आणि विरोधकांचे पाय खेचणे सुरू आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखणं हे गृहमंत्र्यांचे काम आहे, दुर्दैवाने ते होताना दिसत नाहिये.

हे प्रकरण काही लोकांनी पुन्हा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. जे प्रकरण नव्हतं. मुलीच्या वडिलांचे म्हणणं होतं की तेव्हा आमच्यावर दबाव होता. पण त्यांच्यावर आता दबाव आहे. आता त्यांच्यावर दबाव असावा असं मला स्पष्ट दिसतंय. ज्यांच्या मुलीचं निधन झालं आहे, ते आई आणि वडील पाच वर्ष गप्प बसत नाहीत अशी माझी भावना आहे. पाच वर्ष ते म्हणतात की आमच्यावर दबाव होता, त्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवणार? ठाकरे कुटुंबाला, संपूर्ण शिवसेनेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे.

औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलंय. औरंगजेब कबरीतून काढून आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला पण तो त्यांच्यावरच उलटला. या औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या चार दिवसांपासून शिजतंय. आणि या मागे कुणाची प्रेरणा आहे, कुणाची शक्ती आहे आणि कोण पडद्यामागे हालचाली करत होतं,ही सगळी माहिती आमच्याकडे आहे. अशाच प्रकारे तुम्ही राजकारण करणार असाल तर ते राजकारण तुम्हाला लखलाभ. औरंगजेबाला 350-400 वर्षानंतर कबरीबाहेर काढल्यानंतर अशा अनेक कबरी तुम्ही खोदत आहात अशाच कबरीमध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. एका तरुण नेत्यावर, भविष्यावर चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्यासारख्या अनेक नेत्यावर असे प्रयोग झाले. त्यातून तुम्हाला काही निष्पण्ण झाले नाही, तरी तुमच्या आयटी सेल, लीगल सेल हे काम करत आहेत. पण कोणत्या थरापर्यंत जायचं हे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या लोकांनी ठरवलं पाहिजे.

भाजपच राज्य आल्यापासून आणि भाजपमध्ये काही बाडगे गेल्यापासून, एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यापासून त्यांचे अस्वस्थ आत्मे त्यांच्या हाती काही लागत नाही, त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतिष्ठा लाभत नाही. सत्ता आली तरी ते अस्वस्थ आहेत त्यातून त्यांना या अशा कागाळ्या सुचत आहेत. या प्रकरणातून त्यांना फक्त बदनामी करायची आहे. इतके हल्ले पचवून शिवसेना पुढे चालली आहे, ही एक पोटदुखी आहे. अशा कबरी उखडायची असेल तर जस्टिस लोयाची कबर उखडावी लागेल, सोहराबुद्दीनची कबर उखडावी लागेल. आणि महाराष्ट्रात कोकणात रमेश गोवेकरपासून ते अंकूश राणे पर्यंत ते सत्यजित भिसेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य थडगी आणि त्यांचे तपास हे नव्यान करावे लागतील.

याचिकेसाठी जी वेळ निवडलेली आहे, म्हणजे महाराष्ट्रात औरंगजेबावरून वातावरण तापले आहे, दंगली घडल्या आहेत, जाळपोळ झाली आहे सरकारची बदनामी सुरू आहे. नेतृत्वाची बदनामी सुरू आहे. नेतृत्व किती कमजोर आहे हे दिसून आलंय. अशा वेळी अचानक एक याचिका येते. याचिकाकर्त्याच्या मागे एक शक्ती आहे. या याचिकेभोवती औरंगजेबाचं प्रकरण बाजूला सोडून यावर चर्चा घडवली जाते असेही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.