लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपर्यंतच, 1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रयत्न; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधत लाडकी बहीण योजनेवरून महायुतची सरकारचा चांगलाच समाचार घेतला. भारतीय जनता पक्षाला महिलांप्रती फार आदर किंवा प्रेम आहे किंवा त्यांच्या कुटुंबांना मदत व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी ही योजना सुरू केलेली नाही. ही योजना फक्त तीन महिन्यांसाठी आहे. फक्त मतदान होईपर्यंत ही योजना असेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारले.

काँग्रेसच्या, शिवसेनेच्या रॅलीत कुणी महिला दिसल्या की फोटो काढा, अशा धमक्या महिलांना दिल्या जातात. त्यानंतर इतर धमक्या देऊन महिलांना दबावाखाली आणलं जातंय. हे फक्त 1500 रुपयांमध्ये मतं विकत घेण्याचा प्रकार आहे. म्हणून आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये जी पंचसूत्री आहे, जी राहुल गांधींच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे, खरगे साहेब, शरद पवार साहेब यांनी जाहीर केली; त्यात आम्ही महिलांसाठी एक फुलप्रूफ योजना ‘महालक्ष्मी योजना’ जाहीर केली, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच आम्ही महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देऊ आणि कोण कुठं गेलं त्याचा फोटो वगैरे काढणार नाही, असा सणसणीत टोलाही त्यांनी सरकारला लगावला. आम्ही आणलेली योजना ही मतांसाठी नाही, तर महिलांचं भविष्य आणि महिलांच्या घरची चूल पेटावी यासाठी असल्याचे राऊत म्हणाले.

सरकार कुणाच्या बापाचं नाही, जनतेचं आहे

सरकार कुणाच्या बापाचं नाही, सरकार जनतेचं असतं. आपण कुठल्या पक्षातून कुठे गेलात, किती पक्ष बदललात. हे बोलणाऱ्यांनी आधी आपला पूर्व इतिहास पाहिला पाहिजे. सरकार हे जनतेचं असतं, कोणत्या पक्षाचं नसतं. पंतप्रधान मोदींच्या, अमित शहांच्या घरातून किंवा फडणवीसांच्या घरातून हे पैसे येत नाहीत. एकनाथ शिंदेंच्या, अजित पवारांच्या घरातून है पैसे येत नाही. शेती विकून ते पैसे लाडकी बहिण योजनेतून दिले असं नाही. ते आमच्या करातले पैसे आहेत. जनतेच्या करातून निर्माण झालेले पैसे आहेत आणि तेच आम्हाला देताय. आमचेच पैसे आम्हाला देताय. तुम्ही दादागिरी कुणाला करताय, कोणासाठी करताय. 1400 रुपयांना गॅस सिलेंडर मिळतोय आणि 1500 रुपये तुम्ही आम्हाला देताय. म्हणून महालक्ष्मी योजनून 3 हजार रुपये देतोय. निवडणूक काळामध्ये अशा धमक्या महिलांना दिल्या जातील. महिला दुर्लक्ष करतायत. हा तीन महिन्यांचा खेळ आहे, निवडणुकीनंतर त्यांना महालक्ष्मी योजनेचीच मदत मिळणार आहे, हे महिलांना माहित आहे, अशा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

माननीय उद्धव ठाकरे हे 15 तारखेला नाशिकमध्ये सभेसाठी येणार आहेत. त्या सभेमध्ये वंचितचे या भागातले हे नेते पवन पवार, इतर काही भाजपचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. या विधानसभा निवडणुकीत या भागातून शिवसेनेचे आमदार निवडून यावेत यासाठी ते अगदी जोमाने कामाला लागले आहेत. पक्षाची ताकद वाढत आहे. एक-एक प्रमुख नेता जेव्हा त्याच्या संघटन ताकदीसह येतो तेव्हा नक्कीच पक्षाची ताकद वाढते.

17 नोव्हेंबर रोजी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो

17 नोव्हेंबर रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. त्यामुळे तेथे सकाळपासून लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोकं दर्शनाला येतात. ते रात्रीपर्यंत सुरू असतं. यांना परवानगी दिल्यामुळे हा ओघ आहे येण्याचा तो दुपारनंतर अडवला जाईल. तो अडवला गेल्यामुळे तिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे आम्ही वारंवार सांगत आहोत. 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर कोणत्याही प्रकारे कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ही आमची भूमिका आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोकं येतात, त्यांना तुम्ही अडवणार असाल तर तेथे गोंधळ निर्माण होईल. ज्यांना शिवसेनेची, शिवसैनिकांची भिती ज्यांना आहे, ज्यांचे सरकार आहे त्यांनी हे सर्व केलंय, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

बाळासाहेबांची सुद्धा अडवणूक करायची हे प्रेम आहे का?

परंपरेनुसार एक दिवस कुणी अर्ज केला म्हणून त्यांना द्यायचं. शिवसेना कायम तिथे शेवटच्या दिवशी जाहीर सभा घेते. 17 नोव्हेंबर हा दिवस शिवसेनेसाठी बुकच असतो. 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर कुणी कार्यक्रम करतो का? आम्हीच करतो, आमचीच यंत्रणा असते. लाखो शिवसैनिक, मराठी बांधव, हिंदू बांधव येतात त्यांची अडवणूक करायची. बाळासाहेबांची सुद्धा अडवणूक करायची हे यांचं बाळासाहेबांवरचं प्रेम आहे.

छोटा पठ्ठ्या पवार साहेबांच्या वाईटावरच उठलाय

शरद पवार सत्तेतून बाहेर गेल्यानंतर हा पठ्ठ्याच तुमचं काम करेल असे अजित पवार फलटणमध्ये बोलले होते. अजित पवार यांच्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. हा जो छोट्या पठ्ठ्या आहे ही पवार साहेबांच्या वाईटावरच उठला आहे. पवार साहेबांचं असं होई तसं होईल म्हणतात. पण अशा यांच्या शापाने काही होत नाही. पवार साहेबच काम करतायत. पवार साहेबांनीच त्यांना कामाला लावलंय आणि यापुढेही कामाला लावणार.

राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी फडणवीसच असतील

यावेळी महाविकास आघाडीच्या योजनांवर टीका करणाऱ्या मिंधेंना संजय राऊत यांनी चोख उत्तर दिलं. आमचाच आकडा ते पुढे नेतायत ना. तुम्ही सत्तेत येऊन तर दाखवा. आम्हाला खात्री आहे तुम्ही सत्तेत येणारच नाही. म्हणून तर आम्ही आमची योजना पुढे नेलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे सत्तेत येणार नाहीत. इतकंच काय या राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदीही एकनाथ शिंदे नसतील फडणवीसच असतील, असे संजय राऊत म्हणाले.

अजित पवारांचा समाचार

महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीवर टीका करणाऱ्या अजित पवारांनी संजय राऊतांनी सोडलं नाही. जयंत पाटील यांनी अजित पवारांना दिलेल्या उत्तराचा दाखला देत तुमचे काकाच पंचसूत्री पूर्ण करतील, काही चिंता करू नका असे संजय राऊत म्हणाले.