अजूनही वेळ गेलेली नाही, न्यायदेवतेने न्याय करावा; संजय राऊत यांचे मत

अमित शहा यांनी एक बनावट संघटना निर्माण केली आणि निवडणूक आयोगाला शिवसेना नाव द्यायला लावलं, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत, अजूनही वेळ गेलेली नाही, न्यादेवतेने न्याय करावा असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, माननीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ज्यांनी बनावट शिवसेना निर्माण केली आहे त्यांनी हे बोलू नये. बाळासाहेबांच्या नावाचा बनावट वापर करून एक शिवसेना अमित शहा यांनी निर्माण केली आणि ती इथे महाराष्ट्रात काही लोकांना चालवायला दिली. त्यांना बाळासाहेबांच्या भूमिका बनावट वाटणारच. या आधी मुबंईतल्या शिबीरात अशा प्रकारे बाळासाहेबांचा एक प्रयोग आम्ही केला. तेव्हा त्यांच लक्ष गेलं नाही. विज्ञान- तंत्रज्ञान पुढे गेलं आहे, शिंदे गटाचे नेते नरेंद्र मोदी हे यांनी एआय तंत्रज्ञानामुळे देश कसा पुढे गेला आहे याबाबत काही भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत. त्यांनी आपल्या नेत्यांचं ऐकायला पाहिजे. आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा या लोकांशी काय संबंध आहे. अमित शहा यांनी एक बनावट संघटना निर्माण केली आणि त्याला शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाला द्यायला लावलं. म्हणून बाळासाहेब ठाकरेंवर त्यांचा अधिकार होत नाही. विचार बाळासाहेब ठाकरे यांचेच आहेत ना? त्यांनी दोन भागात धर्मवीर सिनेमा काढला होता. ही वेबसीरीज आहे त्याचे 25 भाग काढतील. तो चित्रपट आम्ही पाहिला नाही पण लोक सांगतात. या लोकांपेक्षा आनंद दिघेंना आम्ही जास्त ओळखतो. त्यांच्या नावाने बनावट भूमिका, बनावट विचार, बनावट संवाद हे निर्माण केलेले चालले का? तुम्ही धर्मवीरांचं आम्हाला शिकवू नका. तुमच्या पेक्षा आम्ही जास्त जवळ राहिलो. आमचे राजन विचारे त्यांच्या सर्वात जास्त जवळ होते. तुम्ही आनंद दिघे यांना जसे बनावट पद्धतीने पडद्यावर आणलं त्यावर बोला. पण जे माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वडिल आहेत आणि शिवसेनेचे निर्माते आहेत. अमित शहा हे शिंदे गटाच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्यावर काही केलं असतं तर त्यांची तक्रार योग्य असती. आम्ही शिवसेनाप्रमुखांवर केलं आहे, त्याचा तुमच्याशी काय संबंध? असे संजय राऊत म्हणाले.

तसेच छत्रपती शिवरायांचा पुतळा जर मालवणच्या समुद्रावर उभा राहतो आहे जिकडे छत्रपतींनी जलदुर्ग उभे केले आणि एक नवीन शौर्याचं एक प्रतिमा उभी केली. पण पहिला पुतळा का कोसळला? आणि पहिल्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार अद्याप बाहेर का? त्या पुतळ्यात जो कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आणि तो स्थानिक राजकारणांच्या घरापर्यंत गेला आणि तो पैसा निवडणुकीत वापरला. त्या महाराष्ट्राच्या किंवा शिवरायांच्या गद्दारांवर काय कारवाई झाली? याची माहिती नवीन पुतळ्याचं अनावरण होण्याआधी त्यांनी द्यायला हवी असे संजय राऊत म्हणाले.

घाटकोपरमध्ये काही अमराठी कुटुंबांनी मराठी कुटुंबाना त्रास दिला आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, संदर्भात एसंशि पक्षाचे प्रमुख अमित शाह यांच्याकडे तक्रार करू. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं आहे अस सांगितलं होतं. आम्ही अमित शहा, नरेंद्र मोदी यांना कळवू. कारण शेवटी त्यांना या मुंबईच संपूर्ण गुजरातीकरण करायचा आहे आणि त्याला भाजप बरोबरच्या सगळ्या पक्षांच मुकसमर्थन आहे असे संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या हातात अडीच वर्ष सरकार होतं. त्यांना दोन याचिकांचं निचरा करता आला असता. तेव्हा चंद्रचूड होते, मग त्यांना सहज शक्य होतं, त्यांना हवा तो निकाल घेता आला असता. आता बहुतेक त्यांना हवा तो निकाल घेता येत नाही म्हणून त्यांनी त्या याचिका प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. न्यायदेवतेने जरी डोळ्यावरची न्यायदेवतेच्या पट्टी सोडली असली तरी आम्ही न्यायदेवता न्याय देण्याच्या बाबतीत आंधळीच असायला पाहिजे, तिने इकडे तिकडे पाहू नये. आपल्यासमोर कोण आहे त्या पद्धतीनेच न्याय करावा. भूषण गवई यांना साडेसहा महिन्याचा कार्यकाळ मिळतो आहे. तो जरी कमी वाटला असला, तरी देशाच्या न्यायव्यवस्थेत परिवर्तन घडवायला हे सहा महिने फार आहेत. गवई हे महाराष्ट्र विदर्भाचे सुपुत्र आहेत. या देशातले शोषित पदलित जो समाज आहे लोकशाही मानणारा संविधानावर श्रद्धा असणारा जो समाज आहे त्यांच गवईंवर विशेष लक्ष असेल.

सरकारच्या दबावाखाली आधीच्या खंडपीठाने जी माती खाल्लेली आहे ती माती साफ करण्याचं काम जर न्यायदेवता करू शकली तर आम्हाला आनंदच आहे. गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आहेत, त्यांच्या विषयी कोणतेही मत व्यक्त करणं व्यक्तीशः राजशिष्टाचाराला आणि घटनेला धरून नाही. आमची अपेक्षा आहे की न्यायदेवतेने न्याय करावा आणि अजूनही वेळ गेलेली नाही. काल काय पौर्णिमा अमावस्या होती का? काल ते गावाला गेले तेवढ मला. ते ट्रेनचे लोको पायलट असतील, कारण त्यांना त्या विमानातून उतरवलेलं आहे आणि त्यांना आता लोको पायलट केला लोको पायलटचा अर्थ समजून घ्या असेही संजय राऊत म्हणाले.