…मग तेव्हा आम्ही काय गोट्या खेळत होतो- संजय राऊत

बॉम्बेचे मुंबई व्हायलाच पाहिजे, पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजेत यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 50 वर्षांपासून आंदोलने केली. सर्व स्तरावर आमच्या काही इतर पक्षातील सहकाऱ्यांनीही हा विषय कोर्टात नेला आणि आता अमित शहा म्हणताहेत की, बॉम्बेचे मुंबई करण्यामागे त्यांचे योगदान आहे, मग आम्ही काय गोट्या खेळत होतो? असा टोला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी लगावला.

मुंबईतील मराठी माणसाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गेल्या तीन वर्षांत भाजपने जो अपमान केला त्याबद्दल त्यांनी कधी माफी मागितली आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. गुजरातचे व्यापारी मंडळ महाराष्ट्राच्या राजधानीवर सातत्याने हल्ले करत आहे. मुंबई लुबाडण्याचा त्यांचा डाव सुरू आहे. मुंबईतल्या सर्व उत्तम आणि चांगल्या गोष्टी गुजरातला नेल्या जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

गुजराती व्यापारी मंडळाचा फायदा व्हावा म्हणून उद्योग, व्यापार, इंटरनॅशनल फिनान्स सेंटर, आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र, आमच्या जमिनी, आमची प्रतिष्ठा तोडायचे काम सुरू आहे. गुजराती व्यापारी मंडळाच्या फायद्यासाठी भाजपने शिवसेना तोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील त्यासाठीच तोडली, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.