मिंधे गट जे बोलतं त्यांच्या मागे सुत्रधार कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच मिंध्यांसारखे आम्ही बुटचाटे नाही, उद्धव ठाकरेंनी आमचा स्वाभिमानाचा मार्ग ठरवला आहे, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
मुंबईत आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा संजय राऊत म्हणाले की, मिंधे गट जे बोलतं त्यांच्या मागे सुत्रधार कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे. जर अशा प्रकारचे ही भाषा हे लोक करत आहेत. तर चाळीस वर्ष यांनी ठाकरे कुटुंबीयांचं मीठ खाल्लं, त्यांना नमकहरामी म्हणतात. सत्तेसाठी तुम्ही पक्ष तोडला. तसेच
आम्ही त्यांच्यासारखे बुटचाटे नाही आहोत. आमचा स्वाभिमानाचा मार्ग उद्धव ठाकरेंनी ठरवला आहे. त्या दिशेने आम्ही निघालो आहोत. हे लोक डरपोक आणि भ्रष्टाचारी आहेत. आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी घाबरून हे लोक अमित शहांचे बुट चाटत आहेत असे संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. दिल्लीचे बुट चाटणं, महाराष्ट्रातल्या खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभं राहणं, हे जर कार्य असेल तर मिंधे गट ते कार्य करत आहेत. आम्ही स्वाभिमानाने उभे राहिलेलो आहोत. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यांसोबत आमचे काय संबंध होते हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. आता हे पाळलेले पोपट फडफड करत आहेत त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. या मिंधे गटाने बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची शकलं केली. काल अमित शहा महाराष्ट्रात आले, त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केली, हे जर मिंधेंना मान्य असेल तर ते महाराष्ट्रद्रोही आहेत. आज त्यांच्या हातात सत्ता आहे, पैसा आहे म्हणून त्यांची मस्ती सुरू आहे. माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीभा झडत कशा नाहीत? असेही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.