भाजपने शब्द पाळला नाही म्हणून शिंदे तेव्हा मुख्यमंत्री झाले नाहीत! संजय राऊत यांच्याकडून खरपूस समाचार

मिंधे गटाकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर केल्या जाणाऱ्या आरोपांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी चांगल्याच शब्दात समाचार घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या नेते पदी निवडले होते. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होणार होते. मात्र युतीत असलेल्या भाजपने 50-50 चा शब्द पाळले नाही. भाजपने शब्द पाळला नाही म्हणून तेव्हा शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच त्या नंतर एकनाथ शिंदे आज ज्या नेत्यांकडून त्यांचा सत्कार करून घेत आहेत त्या शरद पवार, अजित पवार आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनीच शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला विरोध केला होता असं म्हणत संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली.

संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना मिंधे गट आणि भाजपवर निशाणा साधला. ‘तुम्ही रोज उठून ज्यांच्या दावणीला चोरलेला धनुष्यबाण बांधत आहात ते योग्य आहे का? रोज उठून तुम्ही दिल्लीला उठाबशा काढताहेत त्या माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मान्य आहेत का? त्यांनी आत्मचिंतनाची गरज आहे. त्यांना आत्मचिंतनाला कुठे जायचं असेल, कामाख्य मंदिरात असेल किंवा आणखी कुठे जायचं असेल तिथे त्यांनी जावं आणि आत्मचिंतन करावं की, आपण मूळ शिवसेनेबाबत जी विधानं करतोय त्यात किती तथ्य आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कधीच कुणी बांधली नाही, असं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. भाजपने शब्द पाळला नाही, त्यांनी बेईमानी केली आणि त्या निर्णयामध्ये स्वत: एकनाथ शिंदे सहभागी होते. हा सामुदायिक निर्णय होता. एकनाथ शिंदे त्या सगळ्या निर्णयांमध्ये आमच्या सोबत हजर होते आणि त्यांनी कधी विरोध केला नाही. त्यांच मत फक्त त्यांना कोणतं खातं मिळतंय यावर होतं. त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. त्यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं, एकनाथ शिंदे फार ज्युनिअर आहेत, त्यांचा हाताखाली आम्ही काम करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदेच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको ही शरद पवारांचीही भूमिका!

‘आज जे त्यांच्या बरोबर बसलेले आहेत, ते अजित पवार, त्यांचे इतर सहकारी, ज्यांनी त्यांचा परवा दिल्लीत सत्कार केला ज्येष्ठ नेते शरद पवार या सगळ्यांची भूमिका होती की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला चालणारच नाहीत. त्यांच्या हाताखाली आमचे नेते काम करणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली होती’, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, भाजपने जर आमचा शब्द पाळला असता, 50/50 चा तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते. दुसरं कोणाचं नाव असण्याचा प्रश्नचं येत नव्हता. उद्धव ठाकरे त्याबाबतीत अत्यंत प्रामाणिक आहेत. पण भाजपने शब्द पाळला नाही म्हणून एकनाश शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत. काल ज्यांनी त्यांचा सत्कार केला त्यांनी महाविकास आघाडीत त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. नंतर सगळ्या घडामोडी घडत असतात, त्या सगळ्या पुढल्या गोष्टी. आम्ही या सगळ्य़ावर आता पाणी सोडलेलं आहे, असं ही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.