BJP-RSSचा अजेंडा; म्हणून न्यायदेवच्या डोळ्यावरील पट्टी हटवली अन् हातात…, संजय राऊत यांचं टिकास्त्र

न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन्याय, बलात्कार, भ्रष्टाचार करणाऱ्यांचे आणि भ्रष्टाचाऱ्यांना वाशिंग मशीनमध्ये टाकणाऱ्यांचे मुंडके उडवण्यासाठी असते. माझ्यासमोर किती मोठी व्यक्ती, ती व्यक्ती किती पदसिद्ध, श्रीमंत किंवा शक्तीमान आहे हे पाहून मी न्याय करणार नाही यासाठी डोळ्यावर पट्टी असते. न्याय सगळ्यासाठी समान, हा न्यायाचा तराजू आहे. पण न्यायदेवतेच्या हातात तलवारी ऐवजी संविधान देण्यात आले असून डोळ्यावरील पट्टीही काढण्यात आली आहे. हा भाजप, आरएसएसचा अजेंडा आहे, असे टिकास्त्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले.

गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, गेल्या 10 वर्षात न्याय, संविधानाचे रक्षण झाल्याचे आम्ही पाहिले नाही. त्यामुळे संविधान धोक्यात असल्याचा नारा आम्हाला लोकसभा निवडणुकीवेळी द्यावा लागला. देशातले संविधान बदलायचे संपूर्ण कारस्थान रचण्यात आले होते. पण देशाच्या जनतेने संविधान वाचवण्यासाठी मोदींचे बहुमत काढून टाकले. यातून मार्ग काढण्यासाठीच न्यायालयाच्या काही लोकांनी भाजपला मदत करायचे ठरवले. अन्यथा अचानक डोळ्यावरील पट्टी काढून हातात संविधान देण्याचे कारण नव्हते.

न्यायदेवता आता उघड्या डोळ्याने खून, बलात्कार, भ्रष्टाचार पाहू शकेल. मोदी, शहा, फडणवीस, मिंधे हे उघड्या डोळ्याने सगळे करताहेत आणि करायलाही लावताहेत. त्यामुळे त्यांनी न्यायदेवच्या डोळ्यावरील पट्टी, हातातील तलवार काढून टाकली आणि हातात संविधान दिले. पण संविधानाचे रक्षण किंवा संविधानानुसार काम होतंय का? असा सवाल करत आम्ही सगळे याचे व्हिक्टीम असल्याचे राऊत म्हणाले.

हा सगळा प्रोपोगंडा आहे

गेल्या अडीच वर्षापासून राज्यात संविधानाच्या विरोधी चाललेले एक सरकार असून ते घटनाबाह्य सरकार रोज भ्रष्टाचार करतंय. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीही त्याच्यावर निर्णय घेण्यास हतबलता दाखवली. संविधानाचे रक्षक असणारे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची हे स्पष्ट असतानाही त्यावर निर्णय देऊ शकले नाहीत. कारण मोदी-शहांची तशी इच्छा नव्हती. संविधानाचा वापर करून लोकशाहीतील विरोधी पक्षांना खतम केले जात आहे आणि तुम्ही डोळे उघडे ठेऊन बघताय. त्यामुळे न्यायदेवतेच्या हातात तलवार काढून संविधान द्यायचे आणि डोळ्याची पट्टी काढायची हा सगळा प्रोपोगंडा आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

मुसलमानांनी, ख्रिश्चनांनी, जैन, पारशी समाजाने मतदान करायचे नाही का?

‘व्होट जिहाद’ची चौकशी केली जाणार असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी म्हटले असून यावरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, व्होट जिहाद कायद्याच्या चौकटीत आहे की नाही हे पहायला फार मोठी समिती किंवा तज्ञांची गरज नाही. याला जातीय आणि धार्मिक रंग दिला जात असून या देशात मुसलमानांनी, ख्रिश्चनांनी, जैन, पारशी समाजाने मतदान करायचे नाही का? मुसलमानांनी भाजपला मतदान करावे, आम्ही तुम्हाला मंत्रीपद देऊ असे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू म्हणतात. हा व्होट जिहादचा विषय होऊ शकत नाही का? असा सवालही राऊत यांनी केला.