शहांनी ईडी, सीबीआयचा जमालगोटा दिल्यानं मिंधे फुटले आणि तोंडानं उलट्या करताहेत; संजय राऊत यांचा घणाघात

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे नेते असून त्यांच्यावर टीका केली म्हणून शिंदेंना धडपडायची गरज नाही, असा जोरदार घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय, हे शिंदेनाही माहिती आहे. तिसरा उपमुख्यमंत्री शिंदेंच्याच पक्षातील असणार याचा पुनरुल्लेखही राऊत यांनी केला.

शनिवारी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, अमित शहा यांनी ईडीचा जमालगोटा दिल्याने मिंधे आणि त्यांची लोक फुटले. ईडी, सीबाआयचा जमालगोटा आमच्याकडे आल्यास आम्हीही त्यांना देऊ आणि 72 तास संडासात बसवू. याच गोळ्या मिंधे आणि त्यांच्या लोकांना दिल्याने अमित शहांच्या बाजुने त्यांची पोपटपंची सुरु आहे.

अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर, स्वाभिमानावर आक्रमण केले. अमित शहा महाराष्ट्र तोडायला निघाले असून त्यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानावर पाय ठेवला आहे. अशावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आवाज उठवत असतील तर त्याचे शिंदेंनी कौतुक केले पाहिजे. पण ते लाचार असून त्यांना दिल्लीतून शहांकडून जमालगोटा दिला जात आहे, त्यामुळे ते तोंडाने उलट्या करत आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

हे सरकार अत्यंत गोंधळलेले

एसटीची भाडेवाढ झाल्याचे परिवहनमंत्री म्हणतात, तर तसा फक्त प्रस्ताव असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात. याचा समाचार घेत राऊत म्हणाले की, हे सरकार अत्यंत गोंधळलेल्या मानसिकतेमध्ये आहे. अर्थमंत्री एका बाजुला, मुख्यमंत्री एका बाजुला आणि ठाण्याचे उपमुख्यमंत्री दरे गावात. अशा तऱ्हेने हे सरकार सुरू आहे. प्रत्येक गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे. तीन-तीन मुख्यमंत्री प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणए काम करताना दिसत आहे. त्यामुळे निर्णय क्षमतेमध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये गोंधळ आहे. यात महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नुकसान होत आहे. फडणवीस यांचेही सरकारवर नियंत्रण नाही. नियंत्रण असते तर दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती.