
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 मंत्र्यांनी त्यांचे ओएसडी व पीए पदांसाठी पाठवलेल्या यादी रोखली आहे. या यादीत कलंकित अधिकाऱ्यांची नावे असल्याने ही यादी रोखण्यात आल्याचे समजते. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आहे. त्यासोबतच त्यांनी त्या 16 मंत्र्यांची नावे देखील जाहीर करण्याचे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.
”मुख्यमंत्र्यांनी एका मंत्र्याला दम देताना सांगितलेय काही मंत्र्यांकडून जी यादी आली त्यातले काही दलाल आणि फिक्सर होते. मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की कोणत्या मंत्र्यांनी आपल्या ओएसडी व पीए म्हणून अशांची नावे पाठवली त्यांची नावे जाहीर करा. महाराष्ट्राच्या हितासाठी जाहीर करा. माझ्या माहितीप्रमाणे यातले बहुतांश मंत्री शिंदे गटाकडून आहेत. म्हणजेच अमित शहांच्या पक्षाचे आहेत. मला मिळालेल्या नावांनुसार यातले 13 शिंदेंचे आहेत व 3 अजित पवार गटाचे आहेत. पण अजित पवारांना त्यांच्या मर्यादा आहेत. ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशांचं पालन करतात. ते पाप धुवायला कुंभमेळ्याला गेले नाही. त्यांना माहित आहे महाराष्ट्रातही अनेक पवित्र नद्या, तिर्थस्थळं आहेत. काही लोकांनी इतकं पाप केलंय, गेल्या अडीच वर्षात पापाचा कडेलोट झाला. ते गेले कुंभमेळ्याला. त्यांचे पीए व ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल व महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान थांबवल्याबद्दल मी फडणवीसांचं अभिनंदन करतो. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो, असे संजय राऊत म्हणाले.
”महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात घटनाबाह्य सरकारने आर्थिक अराजक माजवलं होतं. पाचशे कोटींचं टेंडर पाच हजार कोटी पर्यंत पोहचवलं. कंत्राटारांकडून टेंडर निघण्याआधीच पाचशे कोटी घेऊन मोकळं व्हायचं. अशा कामांना देवेंद्रभाऊ फडणवीसांनी रोख लावलाय असं आम्हाला समजलंय. ही महाराष्ट्राच्या तिजोरीची लूट फडणवीसांनी थांबवलीय. हा ठेकेदारीच्या भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा आहे, हाच पैसा राजकारणात वापरायचा. भ्रष्टाचाराचा पैसा राजकारणात, राजकारणातून परत भ्रष्टाचार हे जर देवेंद्रजी थांबवत असतील तर ते महाराष्ट्रासाठी उत्तम काम करतायत.असं संजय राऊत म्हणाले.