आंदोलकांना ‘शो करताय’ म्हणणारे सरकार भंपक, संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा

एका महिलेचा मृत्यू झाला, दोन बालके पोरकी झालेली असताना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधातील आंदोलकांविषयी ‘शो करताय’ असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. इतकं भंपक सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हतं, मुळात फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची लेव्हलच नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला.

नाशिक येथे शनिवारी खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांसाठी उपचार नाकारल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. एका संघटनेच्या रुग्णालयाविरोधातील आंदोलनावर फडणवीस यांनी केलेल्या असंवेदनशील विधानाचा त्यांनी समाचार घेतला. फडणवीस यांना राज्यात गोंधळच घालायचा आहे, त्यांनी मराठी माणसासाठी कुठलं आंदोलन केलं? त्या रुग्णालयात आरएसएसची लोकं काम करताहेत, भाजपसमर्थक बॉडी असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. उलट आंदोलनकर्त्यांना ‘शो करताहेत’ असं मुख्यमंत्री म्हणतात. त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची लेव्हल नाही. या पदावर बसायला लागणारा दर्जा माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी आणि शरद पवार यांच्याकडे होता. तो दर्जा येईपर्यंत फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद जाईल, असे फडणवीसांना सुनावले.

यावेळी उपनेते अद्वय हिरे, सुनील बागुल, सुधाकर बडगुजर, राज्य संघटक विनायक पांडे, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते, उपस्थित होते.

दुर्बलांच्या नाही, धोरणकर्त्यांच्या कानफटात द्यावी लागते

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचे आंदोलन मागे घेतले, या प्रश्नावर ते म्हणाले की, मनसेने त्यांच्या राजकारणाचीच परंपरा पाळली. मुळात त्यांची आंदोलने देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने चालतात, असा टोला हाणला. त्यांच्या आंदोलनांना मी मराठीविषयीचं आंदोलन म्हणणार नाही. दुर्बलांच्या कानफटात मारून आंदोलनं होतात का? धोरण राबवणाऱ्यांच्या, निर्णय घेण्याची क्षमता असणाऱ्यांच्या कानफटात मारली पाहिजे, असे सांगताना त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांचे, घडवलेल्या बदलांचे दाखले दिले.