रात्रीस खेळ चाले…मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये उतरवल्या पैशांच्या बॅगा

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत असतानाच शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये हेलिकॉप्टरने 9 मोठय़ा बॅगांमधून पैसा पोहोचवला, असे नमूद करत संजय राऊत यांनी त्याचा व्हिडीओच सोशल मीडियावर टाकला आहे. हा पैसा कुठे गेला, कुणाला दिला याची माहिती लवकरच व्हिडीओसह देईन असा इशाराच संजय राऊत यांनी दिला.

निवडणुकीमध्ये महायुतीकडून राज्यात पैशांचा पाऊस पाडला जात असल्याच्या अनेक घटना समोर येत असतानाच संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओने त्यात भर पडली आहे. मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताना या व्हिडियोत दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षारक्षकांच्या हातात अवजड बॅगाही दिसत आहेत. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या व्हिडियोबद्दल सविस्तर माहितीही दिली.

मुख्यमंत्री कुठेही गेले तर त्यांच्याकडे फार फार तर चार-पाच फाईल्स असतात. आता आचारसंहितेत मुख्यमंत्री फाईल्सवरही सही करू शकत नाहीत. मग या 9 ते 10 भल्या मोठय़ा बॅगांमध्ये नेमके होते तरी काय? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री त्या बॅगा घेऊन एका हॉटेलमध्ये गेले. तिथे त्यांनी संबंधित लोकांना ते पैसे वाटले. ते पैसे मतदारसंघामध्ये वाटण्यात आले. ते पैसे मतदारसंघात वाटण्यात आले. काही पैसे इतर ठिकाणीही गेले. आता फक्त बॅगांचा व्हिडियो शेअर केलाय, त्या बॅगा कोणत्या हॉटेलमध्ये नेल्या. तिथून ते पैसे कोणाला वाटण्यात आले? कसे दिले? याची माहिती लवकरच व्हिडियोसह देईन.

‘मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले

तो क्षण… नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पैशांचा पाऊस…दोन तासांच्या दौऱयासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहतआहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरू आहे,’ अशी एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.
पैशांचा कितीही पाऊस पडू द्या, मोदींचा पराभव होणारच

ईडी उत्तम काम करतेय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. पण राज्यात पैसे वाटप होत असल्याचे त्यांना दिसत नाही. कारण ईडी ही भाजपचीच गॅंग आहे, लुटारूंची टोळी आहे असा घणाघातही संजय राऊत यांनी यावेळी केला. सत्ताधाऱयांचा भ्रष्टाचार लपवून ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग राज्यात भ्रष्टाचाराला पाठिंबा देत आहे, मात्र या उन्हाळ्यात कितीही पाऊस पडू द्या, मोदींचा पराभव होणार हे नक्की, असे संजय राऊत म्हणाले. विकास केला असता तर मोदींवर अशी पैसे वाटण्याची वेळ आली असती का? असा सवाल करतानाच, नाशकातला व्हिडिओ हा त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे, असे ते म्हणाले.