महाराष्ट्रात नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण सोहळ्यात घडलेली चेंगराचेंगरी असो किंवा उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेली घटना असो, हे सर्व अंधश्रद्धेचे बळी आहेत. या अंधश्रद्धांना आणि भोंदुगिराला राज्यकर्त्यांकडून खतपाणी घातले जाते. बुवा, महाराजांना राज्यकर्ते आणि राजकीय लोकं प्रतिष्ठा देतात. त्याच्यामुळेच अशा दुर्घटना होतात. देशाचा पंतप्रधानच सर्वात मोठा बुवा असून भोंदुगिरी तिथूनच सुरू होते, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
गुरुवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी हाथरसमध्ये घडलेल्या घटनेवरून सरकारवर टीकेचे आसूड ओढले. हाथरस घटनेमध्ये गुन्हेदाखल करण्यात आले, मात्र ज्याच्यामुळे हे घडले त्या भोलेबाबावर गुन्हा दाखल झालेला नाही. कारण त्याला राजकीय संरक्षण आहे. या सोहळ्यासाठी 80 हजार लोकांची परवानगी होती, मग अडीच लाख लोकं कशी जमली? असा सवालही राऊत यांनी केला.
हाथरस घटनेवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. देशाचा पंतप्रधानच सर्वात मोठा बुवा असून भोंदुगिरी तिथूनच सुरू होते. मोदींनी पंतप्रधानांसारखे वागायला पाहिजे. पण ते गुहेत जाऊन तपस्या करतात. स्वत:ला बाबा, महाराज म्हणून घेतात. स्वत:ला देवाचा अवतार म्हणवून घेतात. माझा जन्म बायोलॉजीकल पद्धतीने झाला नाही असे सांगतात. हिंदू-मुसलमान करतात. ही भोंदुगिरी, बुवाबाजी आहे. देशाचा पंतप्रधानांनाच भोंदुगिरीतून राजकारण करायचं असेल काय करणार, अशी टीका राऊत यांनी केली.
यावेळी खासदार संजय राऊत यांनी खारघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावेळी झालेल्या चेंगराचेंगरीचाही उल्लेख केला. या प्रकरणावरून राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजो होता. मुख्यमंत्र्यांनी भर उन्हात हा कार्यक्रम घेतला होता. हजारो साधक तिथे जमले होते. त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती, उन्हापासून वाचण्यासाठी छप्पर नव्हते. देशाचे गृहमंत्रीही तिथे होते. यावेळी पळापळ होऊन अनेकांचे जीव गेले. यासाठी राज्यसरकारवर कारवाई झाली पाहिजे होती, असे राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन आसामला जातात आणि कामाख्य देवीच्या मंदिरात रेडे कापतात. यांच्यावर कोण कारवाई करणार? जिथे अंधश्रद्धा, बुवाबाजी आहे तिथे राज्यकर्ते, राजकारणी जातात. पंतप्रधान असो की मुख्यमंत्री, त्यांच्यावरही अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यांतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली.
लाडका शेतकरी योजना आणा
अमरावतीमध्ये जून महिन्यात 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्रातही नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. यामुळे व्यथित झालेल्या राऊत यांनी लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका शेतकरी योजना आणण्याची मागणई केली. महाराष्ट्रात रोज 10 शेतकरी आत्महत्या करत आहेत. जानेवारी महिन्यात 350 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भात अमरवाती येथे सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसत आहेत. यावर अर्थमंत्री, मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेले नाही. लाडक्या बहिणीचा भाऊ शेतकरी असून तो आत्महत्या करतो. यामुळे राज्यात दु:खाचे सावत आणि अंधकार पसरलाय, असे राऊत म्हणाले.
पक्ष बदलला नाही, चोरला
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी एक व्हिडीओ जारी करत आपण राजकारणात आल्यापासून पक्ष बदललेला नाही, भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झाला नाही अशी टेप वाजवली. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, अजितदादांनी पक्ष बदललेला नाही, पण आपल्या काकांचा मुळ पक्ष चोरला. त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे. त्यांनी सरळसरळ केलेले पक्षांतर असून मोदी-शहा नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता. मोदी-शहा यांचा महाराष्ट्रद्रोह उफाळला नसता तर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना धनुष्यबाणासह शिंदेंना मिळाली नसती. त्यामुळे जपून बोला, लोकं ऐकताहेत आणि त्यांना समजतंय, असा टोला राऊत यांनी लगावला.