मंत्री संजय राठोड यांनी बेलापूरमधील 500 कोटींचा सरकारी भूखंड लाटला, मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने भूखंड हडप!

नवी मुंबईत बेलापूर येथे गोर बंजारा समाजासाठी दीड एकर भूखंड मिळाला होता. हा पाचशे कोटी रुपये किमतीचा भूखंड स्वतःच्या खासगी ट्रस्टच्या माध्यमातून महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी हडप करून गोर बंजारा समाजाची  फसवणूक केली आहे, असा घणाघाती आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. राठोड यांना हा भूखंड मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन मदत केल्याचा आरोपीही त्यांनी या वेळी केला.

 मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भातील कागदपत्रेच सादर केली. सरकारी भ्रष्टाचार उघड करताना ते म्हणाले की, मंत्री संजय राठोड यांच्या खासगी सचिवांच्या पत्रावर कार्यवाही करून हा भूखंड दिला आहे. यासाठी विहित पद्धतीचा अवलंब केलेला नाही. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया राबविलेली नाही. बेकायदेशीर पत्रावर निर्णय घेऊन हा भूखंड दिला आहे. भ्रष्टाचार उघडकीस आल्यावर संजय राठोड भूखंड परत करण्याची भाषा करीत आहेत. परंतु आता वेळ निघून गेली आहे. पण त्यांचा हेतू बंजारा समाजाच्या लक्षात आला आहे. संजय राठोड मंत्री म्हणून बेकायदा काम केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

सध्या मंत्रिमंडळात असणाऱ्या लाडक्या बिल्डर मंत्र्यांनीदेखील सातशे कोटींचा भूखंड जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या नावाखाली हडप केल्याचा आरोपीही त्यांनी केला आहे. दक्षिण मुंबईत कुलाब्यात मोक्याच्या जागेवर हा भूखंड आहे. कागदपत्रांची हेराफेरी करून भूखंड खाण्याचा उद्योग या हेराफेरी सरकारने  सुरू केल्याचे ते म्हणाले.

जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या खासगी शिक्षण संस्थेच्या नावाखाली 700 कोटी रुपयांचा भूखंड हडप केला आहे. याची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु हा भ्रष्टाचार उघडकीस येईल या भीतीमुळे अजून शासन निर्णय जारी केलेला नाही.  सरकारने अशी चलाखी जरी केली असली तरी हे प्रकरण उजेडात आल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.