मोनेगिरी- सुयोगचा बापमाणूस!!

>> संजय मोने

नाटकाचे, विशेषत मराठी नाटकाचे त्याचे वेड असणारा एक विलक्षण माणूस. निर्माता म्हणून इतर निर्मात्यांच्या कळपात असूनही तो निराळा. नाटय़ निर्माता असूनही त्याच्यात माणुसकी होती. खरंतर मराठी नाटय़ निर्माता आणि माणुसकी असलेला… या दोन शब्दांतूनच वेगळेपण अधोरेखित करणारे सुयोग या नाटय़संस्थेचे सर्वेसर्वा निर्माता सुधीर भट.

एक विलक्षण माणूस… नाटय़ निर्माता असूनही त्याच्यात माणुसकी होती. खरंतर मराठी नाटय़ निर्माता आणि माणुसकी असलेला, या दोन वाक्यांवर हा लेख संपलाय. तरीही तो संपवता येत नाही. निर्माता म्हणून इतर निर्मात्यांच्या कळपात असूनही तो निराळा होता. मुळात जन्माने तो मराठी भाषिक नव्हता. पण गिरगावात लहानाचा मोठा झाल्याने मराठी त्याची मातृभाषा नसली तरी वास्तव्य भाषा मात्र जरूर होती. गिरगावात गणपती उत्सवात सादर होणाऱया नाटकात तो बारीकसारीक कामं करायचा. पुढे असंख्य व्यवसाय त्याने केले. पण नाटकाचे, विशेषत मराठी नाटकाचे त्याचे वेड जाता गेले नाही. त्याने वाडीतल्या गणेश उत्सवात अभिनयही केला. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वग नाटय़ात त्याने प्रमुख भूमिका केली होती असं तिथले काही प्रेक्षक सांगायचे.

होता होता वर्षं लोटली आणि एक दिवस सुयोग निर्मित ‘मोरूची मावशी’ अशी नाटकाची जाहिरात झळकली. आचार्य अत्रेसाहेबांचे नाटक. खूप वर्षांनंतर त्याचं पुनरुज्जीवन सुधीरने केलं 82-83च्या सुमारास. नाटक धोधो चाललं. आजही ते चालू आहे. सुधीरची अत्र्यांवर श्रद्धा होती. त्याचे ते आवडते लेखक होते. जर अत्रेसाहेब असताना सुधीर त्यांना भेटला असता तर असा निर्माता दहा हजार वर्षांत झाला नाही असं प्रशस्तीपत्र त्यांनी सुधीरला बहाल केलं असतं. साहेबांची मोरूची मावशी, ब्रह्मचारी, भ्रमाचा भोपळा, प्रीतिसंगम, अशी बायको हवी, लग्नाची बेडी इत्यादी नाटकं त्याने सादर केली. मराठी नाटकाचा व्यवसाय त्याने फार वेगळ्या पद्धतीने केला. असंख्य कलाकारांना त्याने भक्कम नाइट देऊन त्यांची आर्थिक भरभराट केलीच, पण पडद्याआडच्या कलाकारांची काळजी घेणारा तो पहिला निर्माता ठरला. त्याच्या नाटकाच्या दौऱयावर बससाठी दोन चालक असायचे. बहुतेक वेळी एखादं नाटक चाललं नाही की निर्मात्याला कला आठवते आणि जर ते जोरात चालायला लागलं की तो तत्काळ व्यवसाय होतो. सुधीर या सगळ्यापेक्षा वेगळा होता. त्याची नाटक धंद्याबद्दलची मतं आणि त्याची अंमलबजावणी वेगळी होती. सगळे कलाकार त्याच्याकडे काम करायला उत्सुक असायचे (सभ्यतेच्या मर्यादा पाळायच्या म्हणून उत्सुक असं लिहिलंय, खरंतर हपापलेले असायचे).

त्याने भरपूर नाटकांची निर्मिती केली, त्याचं गणित वापरून केली. नाटकांच्या प्रयोगासाठी उपलब्ध असलेल्या तारखांना जास्त पैसे देऊन, विविध मार्ग वापरून केली. तथाकथित बडय़ा निर्मात्यांचा रोष पत्करून केली. पुढे त्याच निर्मात्यांनी त्याचाच मार्ग अवलंबला. त्याचं एक छान वाक्य होतं, “मोठय़ातला मोठा निर्माता स्टेजवर नाचला आणि लहानातला लहान नट नुसता उभा राहिला तरी प्रेक्षक त्या कलाकारालाच बघायला येतील.’’ त्याची या व्यवसायाबद्दलची गणितं निराळीच होती.

अनेकदा त्याने भावनेच्या भरात काही नाटकांची निर्मिती केली. काही यशस्वी झाली तर काही पार भुईसपाट झाली. मी त्याच्याबरोवर 1989 ते 2002पर्यंत बरीच नाटकं केली. त्याचे-माझे संबंध कायम दोन प्रतलावर होते. असंख्य शिव्याशाप आम्ही एकमेकांना दिले. वादावादी, भांडणं तर कायमचीच. पण लगेच एकमेकांना भेटल्याशिवाय ना त्याला चैन पडायचं ना मला. सक्काळी सक्काळी तो घराच्या खाली हजर असायचा.

मी त्याच्याकडे ‘ती फुलराणी’ नावाचं नाटक केलं होतं 1992-93च्या सुमारास. त्यात मी होतो, पण भक्ती बर्वे पण होती. आम्ही दोघेही जरा वेगळ्या स्वभावाचे होतो. त्यामुळे दोघांचं कसं पटेल याबाबतीत सगळी नाटय़सृष्टी पैजा लावायला तयार होती. तेव्हा सुधीर एकदा माझ्या घरी आला. घरच्या माणसांना त्याच्या दैनंदिन शिव्या दिल्यावर मी आतून उठून बाहेर आलो.

‘ए! xxxxx (शिव्यांच्या ऐवजी असंही लिहिता येतं की, किती छान सोय आहे) उपकार कर! पु.ल. म्हणाले आहेत, तूच हे काम करू शकतोस. माझ्यासाठी कर.’

दुसऱया किंवा तिसऱया प्रयोगाला माझा आणि भक्तीचा बारीक खटका उडाला… ‘तुम्ही तुमचं काम करा, मी माझं करेन,’ असं मी तिला सांगितलं आणि तिथून निघालो (ते मी केलेलं एक वेगळं नाटक होतं म्हणजे नखरा होता. उगाच मान-बिन द्यायचं मला कधीच मान्य नव्हतं. पण त्या प्रसंगानंतर भक्ती बर्वे माझी मैत्रीण झाली). आम्ही त्या नाटकाचे 500च्या आसपास प्रयोग केले. सुधीरच्या कल्पना अफाट असायच्या. ‘लग्नाची बेडी’मधील रश्मीची भूमिका माधुरी दीक्षित यांना द्यायची एक अचाट युक्ती त्याच्या डोक्यात आली. ताबडतोब त्याने तिला गाठलं. दिग्दर्शक विजय केंकरे तिला भेटला. काही वाचनही… नंतर माधुरीने सलग अडीच-तीन तास संवाद म्हणणं अवघड आहे म्हणून नाटकाला नकार दिला. जर ते नाटक इंग्रजीत असतं तर त्याने मेरील स्ट्रीप किंवा जुलिया रॉबर्टसलासुद्धा विचारलं असतं. जर एखादं नाटक त्याला आवडलं तर तो ते नुकसानीत चालत असलं तरी शेवटपर्यंत प्रयत्न करायचा. मराठी नाटक परदेशात आधी झालेले होते, पण दोन-तीन प्रयोग व्हायचे त्याचे. समांतर रंगमंचावरची नाटकं अजून काही प्रयोग करून परत यायची. पण दोन दोन, चार चार नाटकं आठ-दहा आठवडे जाऊन करायची कल्पना त्याची आणि असं त्याने पाच-सात वेळा केलं होतं. कलाकारसुद्धा एकाहून एक विलक्षण आणि विचित्र. कोणाचा कधी आणि कशावरून पारा चढेल ते सांगता येणार नाही असे.

1999 साली आचार्य अत्रे साहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्याने तीन नाटकांची निर्मिती केली. साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा आणि तो मी नव्हेच. अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता तो. त्यात त्याला खूप नुकसान झालं. त्यावर त्याची प्रतिक्रिया होती…

“मी एक साधा माणूस. अत्रे साहेबांच्या मोरूची मावशी नाटकावर खूप पैसे मिळवले. माझं नाव झालं. निर्माता म्हणून उभा राहिलो. त्याच्या पुढे हे नुकसान काहीच नाही.’’

1983 साली क्रिकेटच्या विश्वचषक सामन्यात भारत पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता. 21 जून तारीख होती बहुतेक. कोणीही प्रयोग करायची हिम्मत केली नाही. संपूर्ण भारत टीव्हीवर तो सामना बघणार हे उघड होतं. सुधीर भटने त्या दिवशी ठाण्यात गडकरी रंगायतन येथे लागोपाठ तीन प्रयोग करायचं ठरवलं. सगळ्यांनी त्याला वेडय़ात काढलं. पण तीनही प्रयोग हाऊसफुल्ल झाले. विलक्षण होता तो आणि त्याचे अंदाज.

तो गेला तेव्हा सकाळी आम्हाला भेटला. पुण्याला जाऊन येतो म्हणाला. त्याने तिथे ‘फिश करी राइस’ नावाचं उपहारगृह उघडलं होतं आणि ते जोरात चालत होतं. ती एक त्याची कल्पना जी सगळ्यांनी हाणून पाडली होती. तो परत आला संध्याकाळी आणि रात्री त्याची बातमी आली. आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. अनेक रंगमंच कर्मचारी तिथे होते. त्यातला एक म्हणाला,

“दादा आज आमचा बाप गेला हो!’’ असंख्य भूमिका करून लाखो वाक्यं पाठ म्हणून त्याच्या इतक्या कमी शब्दात आम्हाला कोणालाच आमच्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत.