गंभीरला मीडियापासून दूर ठेवा – मांजरेकर

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरकडे पत्रकारांशी बोलण्याची पद्धत आणि योग्य शब्दांचा अभाव आहे. त्यामुळे कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवू नये म्हणून बीसीसीआयने त्यांना पत्रकारांपासून, प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवावे, अशी विनंती आणि असा आग्रह खुद्द माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी केला आहे.

हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱयाला रवाना होण्यापूर्वी प्रशिक्षक गंभीर यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. या पत्रकार परिषदेत गंभीर यांनी अनेक नाजूक विषयांवर पत्रकारांना अत्यंत रोखठोकपणे उत्तरे दिली. या परिषदेनंतर मांजरेकरांनी गंभीरवर आपला हल्ला चढवला. गंभीर हे मैदानात संघाला मार्गदर्शन करण्यासाठी योग्य आहेत. तसेच त्यांना पडद्यामागे ठेवूनच कामे करून घ्यायला हवीत असे स्पष्ट मत त्यांनी एक्सवर व्यक्त केले.

हिंदुस्थानी संघाने प्रसारमाध्यमांशी बोलण्याची जबाबदारी कर्णधार रोहित शर्मा, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्याकडे सोपविली तर ते संघाच्या भल्याचे ठरेल. गंभीर यांना पत्रकारांशी संवाद साधताना ना त्यांचे आचरण योग्य असते, ना त्यांना योग्य शब्द मांडता येत, अशी जहाल प्रतिक्रिया मांजरेकरांनी व्यक्त केली असली तरी परिषदेतील कोणते वक्तव्य नेमके खटकले याचा खुलासा त्यांनी एक्सवर पोस्टमध्ये केलेला नाही. त्यामुळे मांजरेकरांच्या एक्सवरील पोस्टचाही नेटिझन्सने समाचार घेतला आहे. आज गंभीर यांना न्यूझीलंडविरुद्ध मालिका पराभवाबाबत अनेक प्रश्नांनी भंडावून सोडण्यात आले होते. या मालिकेमुळे हिंदुस्थानचे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीच्या मार्गात असंख्य अडथळे निर्माण झाले आहेत.