पक्षश्रेष्टींना मी लायक वाटलो नसेन, तीन टर्म भाजप आमदाराचा नाराजीचा सूर

विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर महायुतीत मंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच झाली. मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नाराजीचे सूरही उमटू लागले. छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, विजय शिवतारे यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवल्यानंतर आता आणखी एक भाजप आमदार देखील नाराज असल्याचे समोर आले आहे. ठाण्यातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले भाजप आमदार संजय केळकर यांनी मंत्रीपद न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे.

”याबाबतचे सर्व निर्णय पक्षाचे केंद्रीय व राज्य नेतृत्व घेत असते. त्यांना कदाचित मी तितका लायक वाटलो नसेन त्यामुळे मला मंत्रीपद दिले नसेल”, अशी खंत संजय केळकर यांनी व्यक्त केली. ”मी पक्षाच्या स्थापनेपासून काम करत आहे. त्यावेळी काम करताना कधी आमदार मंत्री व्हायचा विचार नव्हता. माझ्या पक्षश्रेष्टींना जेव्हा मी मंत्रीपदासाठी लायक वाटेन तेव्हा ते जबाबदारी देतील”, असेही केळकर म्हणाले.

राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर 8 दिवसांनी मंत्र्यांचे खातेवाटपही पार पडले. त्यानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले. खातेवाटपावरून महायुतीत नाराजी असल्याचे दिसून आले होते. आता दालन आणि बंगल्याच्या वाटपावरूनही अनेक मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. काही मंत्र्यांना विसतारीत इमारतीत दालन दिल्याने नाराजी दिसून येत आहे.