आमदार गायकवाडांनी बळकावलेली जमीन परत द्या, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात निषेधाचे फलक

एकीकडे लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करणाऱ्या मिंधे-भाजप सरकारमधील आमदार संजय गायकवाड यांनी महिलेची जमीन हडपल्याचा आरोप करीत संतप्त महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात निषेधाचे बॅनर झळकावले व आमदार गायकवाडांनी बळकावलेली महिलेची जमीन परत करण्याची मागणी करण्यात आली.

मोताळा येथे रिता उपाध्ये या महिलेची गट नंबर 62 मध्ये दीड एकर जमीन आमदार संजय गायकवाड यांनी बळकावली असल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी ही महिला सर्व पुरावे घेऊन न्यायालयात गेली असता न्यायालयाने आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल देण्याचे आदेश दिले. याबाबत पोलिसांकडून 28 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, आज पीडित महिलेने न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण कार्यक्रमानंतर निषेधाचे बॅनर झळकावून व काळे झेंडे दाखवून नेते जर असा अन्याय अत्याचार करत असतील तर महिलांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे कार्यक्रमात एकच हलकल्लोळ उडाला.