संग्राम थोपटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार, भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा

पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि तीन वेळा आमदार राहिलेले भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. येत्या 22 एप्रिलला हा प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसतर्फे निवडणूक लढविलेल्या संग्राम थोपटे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. नवख्या शंकर मांडेकर यांना ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक रिंगणात उतरवले आणि थोपटेंना तब्बल वीस हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. विधानसभा निवडणुकीपूर्वीदेखील संग्राम थोपटे भाजपच्या संपर्कात होते.

काँग्रेसची सत्ता असताना संग्राम थोपटे विधानसभा अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना सातत्याने डावलण्यात आले. याबाबत त्यांनी वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने ते नाराज होते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा होती.