एसटी महामंडळाचे चार्जिंग स्टेशन रखडले; होतेय फक्त चर्चा; सांगलीतून ई-बस धावण्याची शक्यता धुसरच!

एसटी महामंडळाच्या बसेसची दुर्दैवी अवस्था झाली असतानाच, नव्या 120 ई-बसेस सांगली विभागासाठी मंजूर झाल्या आहेत. याबाबत अधिकाऱयांकडून नुसत्याच चर्चा सुरू आहेत. मात्र, चार्ंजग स्टेशनचा पत्ताच नसल्याने या गाडय़ा मिळण्याची आशा धुसर झाली आहे. महावितरण विभाग आणि एसटी महामंडळात चार्ंजग स्टेशनसाठी लागणाऱया सबस्टेशनवरून गोंधळ सुरू आहे. एसटीच्या अधिकाऱयांनी वीज कनेक्शनसाठी अर्ज केला असतानाही सबस्टेशनअभावी अद्यापि कनेक्शन मिळालेले नाही. त्यामुळे ई-बसेस सुरू होणार तरी कधी, असा प्रश्न आता प्रवासी उपस्थित करत आहेत. याकडे खासदार, आमदार लक्ष देणार का, हे पाहावे लागेल.

सन 2023 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात इंधनाची बचत करण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस वापरण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये या ई-बसेसची सेवा सुरू करण्यात आली. आरामदायी, आवाजविरहित ही बस असल्याने प्रवाशांची त्याला पसंती आहे. शिवाई बससेवा सुरू झाल्यावर कमी पैशात एसीचा प्रवास करता येणार आहे. महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध सुविधा देण्यात येत असून, काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक शिवाई बसची सुरुवात करण्यात आली आहे. सांगली, मिरज आणि ईश्वरपूर अशा तीन आगारांसाठी 120 ई-बसेस मंजूर झाल्या आहेत. यात सांगलीला 40, ईश्वरपूर 40 आणि मिरजेसाठी 40 गाडय़ांचा समावेश आहे. या बसेस चालविण्यासाठी चार्ंजग पॉइंटची गरज असून, राज्य वीज महामंडळाकडून 11/22/33 के.व्ही. क्षमतेची उच्च दाबाची वीजजोडणी आवश्यक आहे. ईश्वरपूर बस डेपोमधील चार्ंजग स्टेशनचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होऊन त्याठिकाणी ई-बसेस येणार आहेत. मात्र, सांगली आणि मिरज डेपोंमधील चार्ंजग स्टेशनचे घोडे महावितरण आणि महामंडळाच्या कारभारात अडले आहे. सूत्रांच्या मते तीन महिन्यांपूर्वी माधवनगर आणि मिरजेतील चार्ंजग स्टेशनची जागा निश्चित करण्यात आली होती. याबाबत कागदोपत्री औपचारिकता पूर्ण करून वरिष्ठांना कळविण्यात आले. मात्र, चार-सहा महिन्यांचा कालावधी होऊनही अद्यापि एसटीच्या ई-बसेस सांगली विभागात आल्या नाहीत. बसेस सोडा त्यांच्या चार्ंजग स्टेशनचीही अद्यापि निर्मिती झालेली नाही.

नेमकं चार्ंजग स्टेशनचे काम का रखडले?

ई-बसेसच्या चार्ंजग स्टेशनचे काम नेमके कोणत्या कारणामुळे रखडले? ते कधी सुरू होणार? कधी पूर्ण होणार, त्याबद्दल काहीही स्पष्ट नाही. चार्ंजग स्टेशनबाबत महामंडळाने वीजजोडणीसाठी महावितरणकडे पत्र पाठवले. मात्र, त्यांच्याकडून सब स्टेशनसाठी महामंडळाकडे 12 गुंठे जागेची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर जागा नसेल तर अधिकचे डीपॉझिट भरावे लागणार होते. ते कोटय़वधी रुपयांमध्ये होते. यामुळे महावितरण आणि महामंडळ यांच्या वादात चार्ंजग स्टेशन रखडल्याची माहिती आता पुढे येत आहे. चार्ंजगचीच सुविधा उपलब्ध नसल्याने आणि ती कधी उपलब्ध होईल, त्याचीही निश्चिती नसल्याने एसटी महामंडळाच्या ई-बसेससाठी सांगली विभागाचा मार्ग अजून बराच दूर असल्याचे सांगितले जाते.

महावितरणकडून माधवनगर आणि मिरज येथे महामंडळाच्या जागेत सब स्टेशन उभारण्यासाठी 12 गुंठे जागेची मागणी करण्यात आली आहे. 12 गुंठे जागा आणि अनामत रक्कम भरली की कनेक्शन देणार आहोत. मात्र, त्यानंतरही एसटी महामंडळाकडून हालचाली झाल्या नाहीत. 12 गुंठे जागेमध्ये सब स्टेशन उभारून चार्ंजग पॉइंटसाठी अखंडित वीजपुरवठा महावितरण करणार आहे. जर जागा द्यायची नसेल तर त्यांनी अधिक अनामत रक्कम भरावी.

– गोविंद वरपे, महावितरण अधिकारी

सांगली एसटी विभागाला 120 ई-बसेस मिळणार आहेत. त्यासाठी चार्ंजग स्टेशन उभारण्यासाठी माधवनगर आणि मिरजेतील जागा निश्चित केल्या आहेत. आम्ही याबाबत महावितरणकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र, महावितरणकडून 100 वर्षांच्या करारावर 12 गुंठे जागेची मागणी झाल्याने काम प्रलंबित आहे. सध्या सांगली विभागातील बसेसची अवस्था पाहाता या नव्या ई-बसेस अत्यंत गरजेच्या आहेत.

– सुनील भोकरे, सांगली एसटी विभागप्रमुख