वर्षभरापासून रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेंगाळले; ढिम्म प्रशासनाचे सांगलीकरांनी घातले वर्षश्राद्ध

सांगलीत चिंतामणीनगर येथील रेल्वेमार्गावरील जुना उड्डाणपूल पाडल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. त्याजागी होत असलेल्या नवीन पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. यामुळे वर्षभरापासून सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. याप्रश्नी ढिम्म प्रशासनाच्या कारभाराविरोधात संतप्त नागरिकांनी वर्षश्राद्ध घालत अनोखे आंदोलन केले. काही नागरिकांनी भटजी आणून श्राद्धपूजेचे सोपस्कार पार पाडत श्राद्धाचे जेवणच घातले.

दक्षिण-मध्य रेल्वेच्या मिरज ते पुणे या लोहमार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे बहुतांशी काम पूर्ण होत आले आहे. याअंतर्गतच सांगलीत माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर येथील नवीन उड्डाणपुलाचे काम मागील वर्षी सुरू केले आहे. सांगली ते विटा-फलटण असा राज्यमार्ग येथून जातो. नवीन पुलाचे काम सुरू करण्यासाठी 10 जून 2023 रोजी जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करून पाडण्यात आला. त्यामुळे सांगलीतून तासगाव, विटय़ाकडे जाण्या-येण्यासाठी जुना बुधगाव रस्ता आणि संजयनगरमार्गे किंवा माधवनगर जकात नाक्यातून कर्नाळ रोड म्हसोबामार्गे असे पर्यायी मार्ग प्रशासनाने सुचविले. त्यावेळी मात्र या पर्यायी मार्गांची अवस्था दयनीय होती. उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वीच या पर्यायी मार्गांच्या रुंदीकरण, डांबरीकरणाची कामे करणे गरजेचे होते. मात्र, ते झाले नाही. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संतापातूनच वर्षपूर्तीनिमित्त वर्षश्राद्ध घालण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले. एक महिन्याच्या आत काम पूर्ण केले नाही, तर बेमुदत ‘रेल रोको’ आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, सतीश साखळकर, माधवनगरच्या सरपंच अंजू तोरो, बुधगावच्या सरपंच वैशाली पाटील, नीलेश हिंगमिरे, योगेश देसाई, बुधगावचे विक्रम पाटील यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.