महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 ची जिह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीपैकी 5 प्रकरणांमध्ये 62 हेक्टर 16 आर. इतकी स्थावर मालमत्ता संबंधितांना परत करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिला.
गरजू व्यावसायिक, नागरिक व शेतकरी यांनी आवश्यकता असल्यास सावकारी परवाना घेतलेल्या सावकारांकडूनच कर्ज घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी केले.
नोंदणीकृत सावकाराने आकारावयाच्या व्याजाची मर्यादा शासनाने घालून दिली आहे. शेतकऱयांसाठी तारणावर आकारावयाचा व्याजदर 9 टक्के असून, बिगर तारणावर आकारावयाचा व्याजदर 12 टक्के आहे. तर बिगर शेतकऱयांसाठी तारणावर आकारावयाचा व्याजदर 15 टक्के असून, बिगर तारणावर आकारावयाचा व्याजदर 18 टक्के आहे. परवाना नसताना अवैध सावकारी करणाऱया व्यक्तीस सावकारी अधिनियमाच्या कलम 39 अन्वये पाच वर्षांचा कारावास व 50 हजार इतक्या दंडाची तरतूद कायद्यात केलेली असून, हा दखलपात्र गुन्हा आहे.
जी कोणी व्यक्ती कर्जदाराकडून सावकाराला देय असलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी उपद्रव देईल, अथवा तिच्या जीविताला धोका असल्याची खात्री झाल्यास अशा प्रकरणी कर्जदाराने संबंधित पोलीस स्टेशनशी योग्य त्या पुराव्यानिशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.