Sangli news – खूनप्रकरणी धुळगावच्या पाचजणांना जन्मठेप; सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

यात्रेत दंगा करत असल्याची तक्रार पंच कमिटीकडे केल्याचा राग मनात धरून अशोक तानाजी भोसले या तरुणाचा खून केल्याबद्दल धुळगाव येथील पाचजणांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी सुनावली. सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले. या खटल्यात सरकार पक्षाकडून 11 साक्षीदार तपासण्यात आले.

संदीप दादासाहेब चौगुले (वय – 26), विशाल बिरुदेव चौगुले (वय – 23), नानासाहेब उर्फ सागर माणिक चौगुले (वय – 20), कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कानप (वय – 25), विजय आप्पासाहेब चौगुले (वय – 23, सर्व रा. अग्रण धुळगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. सुनावणीदरम्यान सागर बाळासाहेब चौगुले यांचे निधन झाले आहे. तर बिरू पांडुरंग कोळेकर या संशयिताला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. यापैकी संदीप व विशाल चौगुले गेली 7 वर्षे न्यायालयीन कोठडीत आहेत.

खटल्याची पार्श्वभूमी अशी की, धुळगाव येथे यल्लमा देवीची यात्रा प्रत्येक वर्षी भरत असते. 2 डिसेंबर 2017 रोजी देवीच्या यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम होता. तमाशाच्या कार्यक्रमांमध्ये संशयित आरोपी दंगा करत असल्याची तक्रार मयत अशोक व त्यांचा भाऊ प्रकाश भोसले यांनी पंच कमिटीकडे केली होती. त्याचा राग मनात धरून रात्री एकच्या दरम्यान आरोपींनी भोसले बंधूवर गुप्ती, कुकरी व काठीने हल्ला केला. यामध्ये अशोक यांना भोसकून त्यांच्यावर अनेक वार केले. तसेच काठ्यांनी पाठीवर जबर मारहाण करून जखमी केले.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अशोक यांना कवठेमहांकाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांमध्ये वरील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक राजन माने यांनी केला होता.