![crime news](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/11/crime-news-696x447.jpg)
जिल्ह्यातील करजगी (ता. जत) येथे एका चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निघृण खून केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना आज सकाळी घडली. खुनानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता. याप्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळ्ळी (वय 45, रा. करजगी) याला उमदी पोलिसांनी तत्काळ अटक केली. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून, पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
करजगी येथे चार वर्षांची चिमुरडी आजी-आजोबांसोबत राहत होती. तिचे आई-वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला आहेत. घराशेजारीच नराधम पांडुरंग कळ्ळी हा आईसह राहतो. त्याच्या घरासमोर असलेल्या बदामाच्या झाडावरून पडलेले बदाम घेण्यासाठी चिमुरडी गेली होती. तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचे भासवले. त्यानंतर पत्रा शेडमध्ये नेऊन तिच्यावार अत्याचार करून तिचा खून केला. खुनानंतर चिमुरडीचा मृतदेह पोत्यात बांधून तो लोखंडी पेटीत लपवला.
दरम्यान, चिमुरडी बराच वेळ दिसेना म्हणून तिची आजी विचारपूस करू लागली. त्यावेळी नराधम पांडुरंग तिला घेऊन गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आजी त्याच्या घराकडे गेली. तेव्हा पांडुरंग पत्र्याच्या शेडसमोर झोपल्याचे दिसले. त्याकडे विचारणा केली असता, माहिती नसल्याचे तो म्हणाला. तसेच त्यानेही बालिकेला शोधण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला. याबाबत नागरिकांनी उमदी पोलिसांना माहिती देत
बालिका बेपत्ता झाल्याचे सांगितले. सहायक निरीक्षक संदीप कांबळे हे पथकासह तातडीने दाखल झाले. पोलीस बालिकेचा शोध घेत असताना पांडुरंग याच्याबरोबर तिला पाहिल्याचे नागरिकांनी सांगितले. शोधाशोध सुरू असताना लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून टाकल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी नराधम पांडुरंगला तत्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. बालिकेच्या खुनाची माहिती मिळताच, परिसरात गर्दी जमली होती. नराधम पांडुरंग कळ्ळी याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.
गावात बंदोबस्त वाढविला
बालिकेवर बलात्कार करून निर्घृण खून केल्याचे समजल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. गावात तणावाचे वातावरण पाहून तातडीने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच उमदी पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या.
जत बंदची हाक
चिमुरडीवर बलात्कार करून केल्याच्या घटनेचे संतप्त पडसाद सर्वत्र उमटत आहेत. करजगी ग्रामस्थांनी उद्या (दि. 7) जत तालुका बंदची हाक दिली आहे. त्यामुळे जत शहरासह करजगी गावात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.