बड्या नेत्यांच्या 5 सूतगिरण्यांची तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया; सांगली जिल्हा बँकेचे 134 कोटी थकवले, पुन्हा निविदा मागविल्या

सांगली जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या पाच सूतगिरण्यांवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जवसुलीसाठी मालमत्ताविक्रीसाठी बँकेने तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. या सूतगिरण्यांकडे तब्बल 134.42 कोटी रुपयांची मुद्दल असून, त्यावरील व्याज वेगळे आहे. बँकेने यापूर्वी दोन वेळा सूतगिरण्यांचा लिलाव जाहीर केला होता. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यापैकी तीन सूतगिरण्या बँकेने स्वतः खरेदी केल्या आहेत.

सांगली जिल्हा बँकेच्या कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी बँकेने स्वामी रामानंदभारती सहकारी सूतगिरणी तासगाव, खानापूर तालुका को. ऑप. स्पिनिंग मिल्स विटा, शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी ईश्वरपूर, प्रतिबिंब मागासवर्गीय को. ऑप. इंडस्ट्रिज ईश्वरपूर आणि विजयालक्ष्मी कॉटन मिल्स, आटपाडी या पाच सूतगिरण्यांच्या मालमत्ता विक्रीसाठी निविदा मागवल्या होत्या. या सर्व सूतगिरण्यांकडे मिळून डिसेंबर 2024 अखेर केवळ मुद्दलाची 134 कोटी 42 लाख 52 हजार रुपये थकबाकी आहे. यावरील थकीत व्याजही कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. या संस्थांच्या लिलावासाठी निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत 20 फेब्रुवारीपर्यंत होती. परंतु एकच निविदा दाखल झाली होती, त्यामुळे प्रक्रिया रद्द करावी लागली.

स्वामी रामानंदभारती सहकारी सूतगिरणी तासगाव 45.81 कोटी, शेतकरी विणकरी सूतगिरणी ईश्वरपूर 49.31 कोटी, खानापूर तालुका को-ऑप. स्पिनिंग मिल्स विटा 17.99 कोटी, प्रतिबिंब मागासवर्गीय इंडस्ट्रिज ईश्वरपूर 7.55 कोटी व विजयालक्ष्मी कॉटन मिल्स, आटपाडीची 13.74 कोटी रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. बँकेने सेक्युरिटायझेशन अॅक्टअंतर्गत या सर्व सूतगिरण्या ताब्यात घेतल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याकडील थकबाकी कायम आहे. बँकेने यापूर्वी या सर्व संस्थांचा लिलाव जाहीर केला होता. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

शेतकरी विणकरी, प्रतिबिंब मागासवर्गीय व विजयालक्ष्मी कॉटन मिल या तीन सूतगिरण्या जिल्हा बँकेने मार्च 2020 मध्ये स्वतः खरेदी केल्या आहेत. बँकेने खरेदी केलेल्या कर्जदार संस्थांची सात वर्षांत विल्हेवाट लावून बँकेची कर्जवसुली करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. या संस्था खरेदी करून मार्चमध्ये 5 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या संस्थांकडील कर्जवसुली कोणत्याही स्थितीत बँकेला करावी लागणार आहे. त्यामुळे बँकेने तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे.

कोणाकडे किती थकबाकी (रक्कम कोटींत)

  • स्वामी रामानंदभारती सहकारी सूतगिरणी तासगाव – 45.81
  • खानापूर तालुका को-ऑप. स्पिनिंग मिल्स विटा – 17.99
  • शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी ईश्वरपूर – 49.31
  • प्रतिबिंब मागासवर्गीय को-ऑप. इंडस्ट्रिज ईश्वरपूर – 7.55
  • विजयालक्ष्मी कॉटन मिल्स आटपाडी – 13.74