![home-tower home-tower](https://www.saamana.com/wp-content/uploads/2019/04/home-tower-696x447.jpg)
केंद्र सरकारने सर्वांना घर देण्याची पुन्हा घोषणा केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 59 हजारांवर लाभार्थी चार वर्षांपासून आवास योजनेच्या प्रतीक्षेत होते. मात्र, घरकुलांना मंजुरी मिळत नव्हती. गतवर्षी केवळ 5248 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आता केंद्र सरकारने सांगली जिल्ह्यासाठी वाढीव तब्बल 27 हजार 459 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये जत तालुक्यास सर्वाधिक 6 हजार 804 घरकुलांचा समावेश आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गरीब, सर्वसामान्यांच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले.
चार वर्षापासूनची प्रतिक्षा संपली, 90 दिवसांत कार्यवाही करण्याचे उद्दिष्ट प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून, सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते. ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसाहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे. जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून 59 हजार लाभार्थी घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत.
सप्टेंबर 2024 मध्ये जिल्ह्यासाठी अवघे 5 हजार 248 घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यामुळे हजारो लाभार्थीना पुन्हा प्रतीक्षा करावी लागली होती. आता केंद्र शासनाच्या घोरणाअंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 27 हजार 459 एवढे अतिरिक्त उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे मागील वर्षीचे आणि नव्याने आलेले मिळून 32 हजार 707 एवढे घरकुलांचे उद्दिष्ट सांगली जिल्ह्यास प्राप्त झाले आहे.
घरकुल मंजुरी प्रक्रिया जिल्ह्यात जोमात सुरू असून, सर्व लाभार्थ्यांना एका घरकुल बांधकामाकरिता 1 लाख 20 हजार चार टप्प्यांत जमा होतील. लाभार्थ्यांना टप्पानिहाय अनुदान थेट त्यांचे आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा होते. सर्व मंजूर लाभार्थ्यांना लवकरच पहिला हप्ता अदा करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी केलेल्या कामानुसार महात्मा गांधी रोजगार हमी योजनाअंतर्गत नरेगाचे अनुदान 26 हजार 730 देण्यात येते. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यास शौचालय बांधकामास 12 हजार प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.
90 दिवसांत बांधकाम पूर्ण करा तृप्ती धोडमिसे
केंद्र सरकारच्या आवास योजनेतून मंजूर झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांनी किमान 90 दिवसांत घरकुल बांधकाम पूर्ण करून घेण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी लाभार्थ्यांस केले आहे.
तालुकानिहाय मंजूर घरकुले (तालुका, घरकुल) पुढीलप्रमाणे : आटपाडी 2537, जत 6804, कडेगाव 2045, कवठेमहांकाळ 2810, खानापूर 2330, मिरज 3861, पलूस 1629, शिराळा 3098, तासगाव 3400, वाळवा 4193.