राज्य सरकारने गाजावाजा करत ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना जाहीर केली. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्याच दिवशी गणवेश देण्यात येणार असे जाहीर केले होते. मात्र, शाळा सुरू होऊन शैक्षणिक वर्ष संपत आले तरी जिल्ह्यातील 1 लाख 16 हजार विद्यार्थी दुसऱ्या गणवेशापासून वंचित आहेत. गणवेश शिवण्यासाठी कापड उपलब्ध झाले असून, ते तालुकास्तरावर पडून आहे. आता विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिक्षण विभागाने डिसेंबरपूर्वी गणवेश मिळतील, असा दावा केला होता. मात्र, तोही फोल ठरला आहे.
सांगली जिल्ह्यात 15 जूनपासून शाळा सुरू झाल्या. राज्यातील सरकारी, स्थानिक संस्थांच्या शाळांना शासनाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राज्य, एक गणवेश’ ही योजना अंमलात आणली आहे. गेली काही वर्षे ठरावीक मुलांनाच मोफत गणवेश मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात जातीसंदर्भात भेदभावाची भावना निर्माण होत आहे. तो दूर करण्यासाठी सर्वच मुलांना गणवेश देण्याची मागणी काही शिक्षक संघटनांनी केली होती. या मागणीचा विचार करून सर्व मुलांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांसाठी गणवेश शिवण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाला देण्यात आले आहे. बचत गटातील सुमारे 3 हजार महिलांकडून गणवेश शिवून घेण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर महिलांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मात्र, अद्याप कापड व त्यामुळे कामच उपलब्ध नाही. या बचत गटातील अनेक महिला शेतकरी कुटुंबातील असल्याने पावसाळा सुरू झाल्याने खरीप हंगामातील कामांमुळे पहिला गणवेश मिळायला विलंब झाला होता. विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठी कापड येऊन दोन महिने होऊन गेले तरी अद्याप शिलाईचा पत्ताच नाही.
गणवेशाविनाच प्रजासत्ताक दिन साजरा होणार?
शिक्षण विभागाने डिसेंबर महिना संपण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश मिळेल, असा दावा केला होता. आज डिसेंबर महिना संपणार आहे. मात्र, दुसऱ्या गणवेशाचा अद्याप पत्ताच नाही. प्राथमिक शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराने गणवेश शिलाईबाबतची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. जिल्ह्यातील 22 विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन गणवेशाविना साजरा झाला होता. जानेवारी महिना सुरू होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 1 लाख 16 हजार विद्यार्थी दुसऱ्या गणवेशाविना प्रजासत्ताक दिन साजरा करणार काय, अशी शंका उपस्थित होत आहे.
सांगली जिल्ह्यात पहिली ते आठवीत दहा तालुक्यांतील 52 हजार 245 विद्यार्थी आहेत, तर मुलींची संख्या 51 हजार 709 आहे. मुले आणि मुली मिळून जिल्ह्यात 1 लाख 16 हजार अशी विद्यार्थी संख्या आहे. या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर गणवेशासाठी कापड उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, शिलाईबाबतची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. चालू शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघा चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.