जिल्हा बँकेचे बड्या नेत्यांच्या कारखान्यांनी 550 कोटी थकवले; सांगलीतील केन, अॅग्रो, वसंतदादा, महांकाली, माणगंगा कारखान्यांचा समावेश

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चार बड्या नेत्यांशी संबंधित साखर कारखान्यांकडे तब्बल 550 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहेत. यामध्ये केन अॅग्रो, वसंतदादा, महांकाली व माणगंगा साखर कारखान्यांचा समावेश आहे. खासदार विशाल पाटील यांच्या संबंधित वसंतदादा कारखाना, वसंतदादा एरिगेटर्स, स्वप्नपूर्ती साखर कारखाना व सह्याद्री मोर्टस या संस्थांकडे तब्बल 190 कोटी, तर भाजपचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या केन अॅग्रो कारखान्याकडे 250 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

सांगली जिल्हा बँकेने मार्चच्या कर्जवसुलीसाठी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ व संचालक मंडळाने कर्जवसुलीवर जोर देत शेतीकर्जासह बिगरशेती कर्जाच्या वसुलीला प्राधान्य दिले आहे. जिल्हा बँकेची बिगरशेती संस्थांकडे सुमारे एक हजार कोटीपेक्षा जास्त थकबाकी आहे. विशेष म्हणजे यात जिल्ह्यातील बड्या नेत्यांशी संबंधित साखर कारखाने, सूतगिरण्या व अन्य सहकारी संस्थांचा समावेश आहे. यातील काही नेते जिल्हा बँकेतही संचालक आहेत. अध्यक्ष नाईक व सीईओ वाघ यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थकबाकीदार संस्थांवर वसुलीसाठी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

तब्बल 550 कोटी रुपये थकीत आहेत. खासदार विशाल पाटील यांचा वसंतदादा कारखाना, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा केन अॅग्रो, जिल्हा बँकेच्या संचालिका अनिता सगरे यांचा महांकाली व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याशी संबंधित माणगंगा साखर कारखान्याचा समावेश आहे. कर्जवसुलीसाठी या चारही कारखान्यांची मालमत्ता जिल्हा बँकेने सिक्युरिटायझेशन अॅक्ट अंतर्गत ताब्यात घेतली आहे. यातील काहींचा लिलाव काढण्यात आला होता; पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. केन अॅग्रो कारखान्याकडे तब्बल 250 कोटी रुपये थकीत आहेत. या कारखान्याची थकबाकी वसुलीसाठी कंपनी लवादासमोर प्रकरण असून, सात सामान्य हप्त्यांत कर्ज फेडण्याची तयारी कारखान्याची आहे. याबाबत लवादाचा अंतिम निर्णय झालेला नाही.

वसंतदादा साखर कारखाना दत्त इंडिया कंपनीला चालवण्यास दिला आहे. कंपनीने गेल्या तीन वर्षांत एक रुपयाही भरलेला नाही. त्यामुळे बँकेने कंपनी व कारखान्याला नोटीस बजावून करार मोडून कारखाना ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे. महांकाली कारखान्याची जमीन विक्री करून जिल्हा बँकेचे कर्ज फेडण्याचे आदेश ऋण वसुली अपिलीय प्राधिकरणाने दिले होते. त्यानुसार मागील वर्षी बँकेने कारखान्यांना जमीनविक्रीची परवानगी दिली. त्याबाबतच करार करण्यात आला. मात्र, तरीही कारखान्याने कर्ज फेडले नाही. त्यामुळे बँकेने करार मोडून कारखाना पुन्हा ताब्यात घेत लिलाव काढण्याची प्रक्रिया सुरू केली. याविरोधात कारखान्याने आता पुन्हा डीआयटीमध्ये याचिका दाखल केली आहे.

गतवर्षी तो चालवण्यास देण्यात आला; पण ते शक्य न झाल्याने संबंधित कंपनीने पुन्हा कारखाना जिल्हा बँकेकडे सुपूर्द केला. या कारखान्याचा लिलाव काढण्यात आला; पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. माजी खासदार संजयकाका पाटील यांच्याशी संबंधित संस्थांकडील थकबाकी वसुलीसाठी बँकेने एनसीएलटीमध्ये दावा दाखल केल्यानंतर या संस्थांकडील 67 कोटी रुपये वसूल झाले आहेत. संजयकाका पाटील यांच्याशी संबंधित केवळ डिवाईन फूड्स या संस्थेची थकबाकी आहे.

वसंतदादा दूध संघ, स्वप्नपूर्तीविरुद्ध याचिका

जिल्हा बँकेचे संचालक व वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष खासदार विशाल पाटील यांच्याशी संबंधित संस्थांकडे बँकेचे तब्बल 190 कोटी रुपये थकीत आहेत. त्यामध्ये वसंतदादा कारखान्यासह वसंतदादा एरिगेटर्स (14 कोटी), वसंतदादा दूध संघ (7.50 कोटी), स्वप्नपूर्ती कारखाना (23 कोटी) व सह्याद्री मोटर्सचा समावेश आहे. यातील सह्याद्री मोटर्सचे कर्जखाते नियमित आहे. तर, वसंतदादा दूध संघ व स्वप्नपूर्तीकडील थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँकेने एनसीएलटीएकडे (ऋण वसुली आपिलीय प्रधीकरणाने ) याचीका दाखल केली आहे.