प्रेमसंबंधात अडथळा अन् संपत्तीत वाटा नको म्हणून आईनेच केला मुलांचा खून; प्रियकरासह पोलिसांनी केली अटक

शेतजमीन आणि संपत्तीत वाटा व प्रेमसंबंधात अडथळा नको या हेतूने आईनेच प्रियकराच्या मदतीने पोटच्या दोन मुलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावात ही घटना घडली होती. कविता सारंग पावसे (रा. हिवरगाव पावसा, तालुका संगमनेर) आणि सचिन बाबाजी गाडे (रा. सावरगाव तळ, तालुका संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

काही महिन्यांपूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या गावात शेततळ्यात बुडून लहान मुलांचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा त्यावेळेस गावामध्ये होती. यामध्ये रितेश सारंग पावसे (वय – 12) आणि प्रणव सारंग पावसे (वय – 8) या दोन भावंडांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आले होती. मात्र सदर प्रकरणी हिवरगाव पावसा गावातील गावकऱ्यांना संशय होता.

मुलाच्या आईचे सावरगाव तळ येथील सचिन गाडे याच्याशी प्रेम संबंध असल्याने या प्रेमसंबंधातील अडथळा आणि मुलांच्या नावावर होणारी संपत्ती या दोन्ही कारणाने प्रियकर आणि महिलेने मिळून त्या मुलांचा काटा काढला असावा असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलीस तपासात दिरंगाई होत असल्याने या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात यावी यासाठी आंदोलन देखील करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून सदर घटनेचा तपास करण्याबाबत सूचना आणि गती दिली.

प्रेम प्रकरणात अडथळा आणि संपत्तीसाठी मुलांचा खून करण्यात आला असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे सदर महिला आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सदर संशयित आरोपी महिला हिच्या पतीचे निधन झालेले आहे. त्या बाबतही आता कुजबूज सुरू आहे. तसेच मयत दोन्ही मुले ही बाहेरगावी शिकायला असताना त्यांना घरी बोलावून त्यांचा खून करण्यात आला अशी चर्चा होती. शिवाय या महिलेचा मयत पतीची मोठी शेतजमीन व संपत्ती मुलांच्या नावावर होईल. त्यामुळे संपत्ती मिळवण्याच्या हेतूने आणि प्रेम संबंधातील अडथळा या दुहेरी हेतूने हा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले.