![latur rape](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/08/latur-rape-696x447.jpg)
सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून प्रेमाचे मेसेज पाठवून अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संशयित तुकाराम मारुती सांगोलकर (वय 40, रा. अष्टविनायकनगर, जुना कुपवाड रोड, वारणाली, सांगली) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कार, पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पीडित युवती ही मूळची परराज्यातील असून, आपल्या कुटुंबीयासह सांगलीतील एका उपनगरात राहून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. संशयित तुकाराम सांगोलकर याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी ओळख वाढवली, तिला वारंवार प्रेमाचे मेसेज केले. त्यानंतर संशयिताने ऑगस्ट 2023मध्ये एके दिवशी महाविद्यालयात जाऊन तिला कारमध्ये घेतले. कारमधून मिरज तालुक्यातील दंडोबा डोंगर परिसरात नेले. देवदर्शन करून परत येताना फोटो काढण्याचे निमित्त करून त्याने कार रस्त्यात थांबवली. तेथील झाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार कोणाला सांगू नको, नाहीतर तुझ्यासह आई-वडिलांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तेव्हापासून संशयित सांगोलकर हा युवतीवर अत्याचार करीत होता. दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजीही त्याने असेच अत्याचार केले. त्याच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने विश्रामबाग पोलिसांत संशयित तुकाराम सांगोलकर याच्याविरुद्ध फिर्याद दिली.