म्हैसाळ सिंचन योजना सौरऊर्जेवर चालणार

मागील काही वर्षांपासून सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर राज्यभरातील सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार जिह्यातील ‘म्हैसाळ सिंचन योजने’चा समावेश सौरऊर्जा प्रकल्पात करण्यात आला आहे. या पथदर्शी प्रकल्पासाठी 1594 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयाने म्हैसाळ योजना सौरऊर्जेवर चालविण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे शेतकऱयांना फायदा होण्याच्या आशा आहेत.

सांगली जिह्यातील म्हैसाळ योजना सौरऊर्जेवर चालविण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. सध्या पाणी उपशाच्या वीजबिलापैकी 81 टक्के हिस्सा शासन भरते, तर 19 टक्के वीज बिल लाभार्थी शेतकऱयांना भरावे लागते. प्रतिएकरी पाणीपट्टी वसूल करून वीजबिलाची तरतूद केली जाते. मात्र, पैसे भरण्यास शेतकरी टाळाटाळ करीत असल्याने थकबाकीचा डोंगर वाढत जातो. थकबाकी वसुलीसाठी महावितरणने यापूर्वी अनेकदा योजनेचा वीजपुरवठाही खंडित केला होता. सध्या गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या सिंचन योजनांच्या उपशाचे वीज बिल मात्र टंचाई निधीतून भागवले जाणार आहे. थकबाकीची डोकेदुखी निकाली काढण्यासाठी सौरउर्जेचा प्रस्ताव विविध स्तरांतून मांडला जात होता.

आता अर्थसंकल्पातील घोषणेनुसार ही योजना सौरऊर्जेवर चालवली जाणार असल्याने वीज थकबाकीचा प्रश्न निकाली निघणार आहे. योजनेच्या सहा मुख्य पंपगृहांसह सर्व संलग्न योजनांना सौरऊर्जेतून वीज मिळेल. अतिरिक्त वीज महावितरणला विकून पैसेही मिळवता येतील. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी किमान 300 ते 400 एकर जागेची आवश्यकता असेल. म्हैसाळमध्ये 300 एकर गायरान उपलब्ध आहे. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात येणार आहे.