ईकासपुरूष बनला दारूसम्राट!, संदिपान भुमरे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून पाच वाईनशॉप घेतले

शिवसेनेशी गद्दारी करणारे ‘ईकासपुरुष’ संदिपान भुमरे आता ‘दारूसम्राट’ बनले आहेत! मंत्रिपदाचा गैरवापर करून भुमरे यांनी सहा वाईनशॉप्सचे परवाने मिळवले आहेत. त्यापैकी तीन परवाने शिक्षक असलेल्या सुनेच्या नावावर असून, दोन पत्नीच्या नावावर आहेत. एक परवाना नातलगाच्या नावावर आहे. वाईनशॉप्ससाठी परवाने घेताना अधिकृत सरकारी चलन 1 कोटी रुपये भरावे लागते. मात्र, निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात भुमरे यांनी आपले उत्पन्न केवळ दोन कोटी रुपये दाखवल्याचा भंडाफोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी केला आहे. यासंदर्भात लोकायुक्त, लोकसभा अध्यक्ष तसेच पंतप्रधानांकडेही तक्रार करण्यात आली असून, दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे गोर्डे यांनी सांगितले.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिपदाचा गैरवापर करून संदिपान भुमरे यांनी केलेल्या गैरव्यवहाराची लक्तरेच टांगली. मंत्री झाल्यानंतर संदिपान भुमरे यांनी सरकारी दारूचे गुत्तेच घ्यायला सुरुवात केली. जालन्यापासून नाशिक, पुण्यापर्यंत भुमरे यांचे दारूचे साम्राज्य उभे राहिले आहे. पैठण विधानसभा मतदारसंघात गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांच्या शिक्षक असलेल्या पत्नी वर्षा यांच्या नावावर वाळूज, पुणे, जळगाव येथे वाईन शॉप्सचे तीन परवाने आहेत. तर भुमरे यांच्या पत्नी पुष्पा बाई यांच्या नावाने जालना आणि जळगावात दोन वाईन शॉप्सचे परवाने आहेत. भुमरे यांचे नातलग काकडे आणि रेवडकर यांच्या नावानेही छत्रपती संभाजीनगरातील फारोळा येथे वाईन शॉप्सचा परवाना आहे.

वाईन शॉपचा परवाना आवाक्याबाहेर

राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून वाईन शॉप्सचा परवाना देण्यात येतो. परवाना घेण्यासाठी एक कोटी रुपयांचे चलन अधिकृत भरावे लागते. परंतु, हे चलन भरून भागत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या विभागांच्याही परवानग्या लागतात. त्यासाठी अधिकार्‍यांचे खिसे गरम करावे लागतात ते वेगळेच. संदिपान भुमरे यांच्याकडे सध्या पाच आणि एक नातलगाच्या नावावर असे सहा वाईन शॉप्सचे परवाने आहेत. भुमरे यांनी ज्यावेळी हे परवाने घेतले त्यावेळी प्रत्येक परवान्याची बाजारभावानुसार किंमत साधारण 7 कोटी रुपये एवढी होती.

निवडणूक आयोगाला चुना लावला

वाईन शॉप्सचे परवाने घेताना संदिपान भुमरे यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. बाजारभावाप्रमाणे भुमरे यांनी घेतलेल्या सहा परवान्यांची एकत्रित रक्कम अंदाजे 42 कोटी रुपये एवढी होते. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या शपथपत्रात भुमरे यांनी पती-पत्नीचे एकत्रित उत्पन्न केवळ दोन कोटी रुपये दाखवले आहे. 2020 ते 2024 या काळातील हे उत्पन्न आहे. गंमत म्हणजे या काळात भुमरे यांचे उत्पन्न होते 2.7 कोटी रुपये तर दहा वर्षांतील त्यांचे उत्पन्न आहे 2.64 कोटी रुपये! उत्पन्नात घट असताना भुमरे यांनी परवान्यांसाठी मोजलेले 42 कोटी रुपये आणले कोठून, असा सवाल दत्ता गोर्डे यांनी केला.

वळदगाव, पैठणला प्लॉट, जमीन खरेदी

संदिपान भुमरे यांनी मंत्रीपदावर असताना 7 जुलै 2022 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वळदगाव येथील गट नंबर 144 मध्ये एक प्लॉट 1.96 कोटी रुपयांना खरेदी केला. तर पैठण शहरात गट नंबर 127/2 ही जमीन 14 जुलै 2023 रोजी 1.6 कोटी रुपयांना खरेदी केली. या सर्व व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दत्ता गोर्डे यांनी केली.

चार वर्षांत पत्नीच्या नावे दोन वाईन शॉप

खासदार संदिपान भुमरे यांनी पत्नी पुष्पाबाई यांच्या नावे दोन वाईन शॉपचे परवाने घेतले. त्याचे शासकीय हस्तांतरण, नाव बदलणे यासाठी दोन कोटी रुपयांचे सरकारी चलन भरणे अनिवार्य आहे. याशिवाय त्याठिकाणची जागेची किंमत असा हा सगळा खर्च साधारण पाच कोटींच्या घरात जातो. भुमरे यांचे उत्पन्न कमी असताना त्यांनी हे परवाने खरेदी करण्यासाठी पैसा कोठून आणला, याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे, असे दत्ता गोर्डे म्हणाले.

शिक्षक असताना सुनेच्या नावावर परवाने कसे?

संदिपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांनी 2014 मध्ये जिल्हा परिषद सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 2013-14 चे एकूण उत्पन्न 5.72 लाख रुपये दाखवले. 2019 च्या निवडणुकीत विलास भुमरे यांचे उत्पन्न दहा पटीने वाढून 49 लाखांवर गेले. विलास भुमरे यांच्या पत्नी वर्षा या पाचोड येथील शिवछत्रपती प्राथमिक शाळेवर शिक्षिका आहेत. शिक्षिका असूनही त्यांच्या नावावर चक्क तीन वाईन शॉप्सचे परवाने भुमरे यांनी मिळवले! विशेष म्हणजे शिक्षिका म्हणून त्या गलेलठ्ठ पगार घेत असतानाही विलास भुमरे यांनी आपल्या शपथपत्रात त्यांचे उत्पन्न शून्य दाखवले आहे.

तक्रारीची दखल न घेतल्यास न्यायालयात जाणार

संदिपान भुमरे हे सत्तेचा गैरवापर करून दारूसम्राट बनले आहेत. वाईन शॉप्सचे परवाने मिळवण्यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला. या संपूर्ण प्र्ाकरणाची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी दत्ता गोर्डे यांनी केली. यासंदर्भात लोकायुक्त, लोकसभा अध्यक्ष तसेच पंतप्रधान कार्यालयाकडे पुराव्यानिशी तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीची दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी शुभम पिवळ, माजी सरपंच अप्पासाहेब गायकवाड, सचिन राजपूत यांची उपस्थिती होती.

गृहमंत्रालयाने वाईन शॉप्सच्या परवान्यांसाठी आचारसंहिता ठरवून दिली आहे. त्याचबरोबर त्यासाठी कडक नियमावलीही बनवण्यात आली आहे. गृहखात्याच्या आचारसंहितेतील कलम क्रमांक दोन उपकलम ड नुसार संदिपान भुमरे यांना वाईन शॉप्सचा परवाना घेताच येत नाही. त्यांच्या कुटुंबीयांनाही परवाने घेता येत नाही. मात्र, भुमरे यांनी गृहखात्याची आचारसंहिताच गोदापात्रात बुडवली!