T20 World Cup 2024 : अमेरिकेने संदीपला व्हिसा देण्यास दिला नकार; बलात्कार प्रकरणात मिळाली होती क्लीन चिट

नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लमिछानेचे T20 विश्वचषक 2024 मध्ये खेळण्याचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले आहे. अमेरिकेने संदीपला दुसऱ्यांदा व्हिसा देण्यास नकार दिला आहे. ज्यावेळी नेपाळने T20 विश्वचषकासाठी संघ जाहीर केला तेव्हा संदीप बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात होता. मात्र आता न्यायालयाने संदीपला बलात्कार प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. पण अमेरिकेने संदीपला व्हिसा देण्यास नकार दिला आहे.

बलात्कार प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतर संदीप आता अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून संदीपने अमेरिकेला व्हिसासाठी अर्ज केला. मात्र नेपाळमधील अमेरिकन दूतावासाने त्याला व्हिसा देण्यास नकार दिला आहे. दुसऱ्यांदा संदीपला व्हिसा मिळावा यासाठी सरकार आणि नेपाळ क्रिकेटनेही हस्तक्षेप केला. पण त्यानंतर संदीपला अमेरिकेचा व्हिसा देण्यात आला नाही.

संदीपला व्हिसा देण्यास नकार देण्याची ही दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा व्हिसा नाकारण्यात आलेल्या संदीपने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली होती. यावेळी अमेरिकेने 2019 साली देखील अशीच परिस्थिती निर्माण केली होती. “यूएस दूतावासाने पुन्हा तेच केले जे त्यांनी 2019 मध्ये केले, त्यांनी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी माझा व्हिसा नाकारला. दुर्दैवाने. नेपाळ क्रिकेटच्या सर्व हितचिंतकांची मी दिलगिरी व्यक्त करत आहे”, असे संदीपने पोस्टमध्ये लिहिले होते.

बलात्काराप्रकरणी 8 वर्षांची सुनावली होती शिक्षा

एका अल्पवयीन मुलीसोबत गैरव्यवहार केल्याप्रकरणी संदीपला अटक झाली होती. याप्रकरणी संदीपला न्यायालयाने आठ वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र यानंतर पाटण्यातील उच्च न्यायालायाच्या खंडपीठाने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले. तसेच संदीपची या प्रकरणातून निर्दोष मुक्तताही करण्यात आली.