गुजरातमध्ये रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या मजुरांवर वाळूचा डंपर उलटला, चौघांचा मृत्यू

गुजरातमधील बनासकांठा येथील थरड राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला. येथील खेंगारपुरा गावाजवळ वाळूने भरलेला डंपर पलटी होऊन रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या 4 कामगारांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्याचबरोबर डंपर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे.

गुजरातमधील बनासकांठा येथे हा अपघात घडला असून डंपर उलटल्याने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या तीन महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर लोकांनी मदतकार्य सुरू करुन जेसीबीच्या मदतीने मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. थरड पोलीस संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सर्व मृत कामगार दाहोद जिल्ह्यातील असून कामासाठी तिथे आले होते. थरड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याचे काम सुरू होते आणि वळणावर बाहेर पडण्यासाठी जागा नव्हती. तरीही चालक डंपर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे डंपर उलटला.